(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Neeraj Chopra : नीरज चोप्राची अभिमानास्पद कामगिरी; फिटनेस, सराव अन् तंत्र, नीरजसमोर काय आव्हानं होती?
Neeraj Chopra : एका वर्षात टोकियो ऑलिम्पिकचं सुवर्ण आणि त्यापाठोपाठ जागतिक ॲथलेटिक्सचं रौप्यपदक जिंकणं काही सोपं नव्हतं. पण भारताच्या नीरज चोप्रानं ते आव्हान कसं पेललं जाणून घेऊयात.
World Athletics Championships 2022: नीरज चोप्राला भालाफेकीचं जग जिंकण्यात अपयश आलं असलं तरी अमेरिकेतल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतलं रौप्यपदक ही त्याची कामगिरी देशासाठी अभिमानास्पद आहे. कारण जेमतेम एका वर्षात टोकियो ऑलिम्पिकचं सुवर्ण आणि त्यापाठोपाठ जागतिक ॲथलेटिक्सचं रौप्यपदक जिंकणं काही सोपं नव्हतं. पण भारताच्या नीरज चोप्रानं ते आव्हान कसं पेललं जाणून घेऊयात.
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं टोकियोत नवा इतिहास घडवला. ऑलिम्पिकच्या इतिहासात सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा केवळ दुसरा भारतीय ठरला. टोकियो ऑलिम्पिकमधल्या ऐतिहासिक कामगिरीला एक वर्ष होण्याच्या आत नीरज चोप्रानं दुसरा पराक्रम गाजवला. ओरेगॉनमधल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्रा रौप्यपदकाचा मानकरी ठरला.
अवघ्या वर्षभरात ऑलिम्पिकचं सुवर्णपदक आणि त्यापाठोपाठ जागतिक ॲथलेटिक्सचं रौप्यपदक या कामगिरीनं नीरज चोप्राला आज देशातला सर्वात श्रीमंत ॲथलिट ठरवलं.
नीरज चोप्रा हा टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता असला तरी अवघ्या वर्षभरात जागतिक ॲथलेटिक्सचं रौप्यपदक जिंकणं काही सोपं नव्हतं. याचं कारण टोकियोतल्या पराक्रमानंतर नीरजचे पाच ते सहा महिने हे सत्कार सोहळ्यांवरच खर्च झाले. पण डिसेंबरनंतर त्यानं वर्षभराचा अभ्यासक्रम अवघ्या सहा महिन्यांमध्ये पूर्ण करून कमाल केली.
नीरज चोप्रासमोर काय आव्हानं होती?
टोकियो ऑलिम्पिकनंतर वाढलेलं 14 किलो वजन घटवणं
सर्वोच्च दर्जाला साजेसा फिटनेस नव्यानं मिळवणं
शारीरिक ताकद आणि लवचिकता पुन्हा मिळवणं
भालाफेकीचा सराव आणि तंत्र सुधारणा यावर भर
सर्वात मुख्य म्हणजे स्नायूंच्या नव्या दुखापती टाळणं
भालाफेकीचा एक उत्तम विद्यार्थी असलेल्या नीरज चोप्रानं ती सारी आव्हानं मोठ्या ताकदीनं पेलली. म्हणूनच जागतिक ॲथलेटिक्सच्या रणांगणात त्याला रौप्यपदकाला गवसणी घालता आली. अर्थात ग्रेनाडाच्या ॲण्डरसन पीटर्सनं आपली कामगिरी सातत्यानं 90 मीटर्सपेक्षा अधिक उंचावली. त्यामुळंच सुवर्णपदकाच्या शर्यतीत नीरजला हार स्वीकारावी लागली.
पण नीरजच्या रुपेरी कामगिरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यानं जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतली भारताची तब्बल 19 वर्षांची पदकाची प्रतीक्षा अखेर संपवली. 2003 साली अंजू बॉबी जॉर्जनं भारताला लांब उडीचं कांस्यपदक पटकावून दिलं होतं. त्यानंतर तब्बल 19 वर्षांनी जागतिक ॲथलेटिक्समध्ये पदकाची कमाई करणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय ठरला.
अवघ्या 24 वर्षांच्या आयुष्यात नीरज चोप्रानं घडवलेला हा सारा इतिहास देशासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. नजिकच्या काळात तो आपल्या शिरपेचात मानाचे आणखी तुरे खोवेल, यात शंका नाही. पण नीरज चोप्राच्या या कामगिरीतून स्फूर्ती घेऊन देशाला विविध खेळात आणि क्षेत्रातही नवे चॅम्पियन मिळोत, हीच सदिच्छा.
इतर महत्वाच्या बातम्या
Neeraj Chopra : अन् नीरजनं विश्वास सार्थ ठरवला; जाणून घ्या आजच्या फायनलमधील महत्वाच्या 10 घडामोडी