Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Haribhau Bagde : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी कोल्हे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. मात्र विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळल्याचे दिसून आले.
Haribhau Bagde : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) सोमवारी गोदावरी दूध संघाच्या कार्यक्रमासाठी कोपरगाव (Kopargaon) दौऱ्यावर होते. त्यांच्या अधिकृत शासकीय दौऱ्यात ते दुपारी 2 वाजता कोल्हे वस्ती येथे भेट देणार असल्याचे नमूद होते. मात्र विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळल्याचे दिसून आले. यावरून राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी कोल्हे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बिपीन कोल्हे आणि संजिवनी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी हरिभाऊ बागडे यांनी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत आदरांजली वाहिली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित न राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दूध आणि साखर एकत्र यायला तयार नाही
हरिभाऊ बागडे म्हणाले की, पक्ष संघटनेत काम करताना एकत्र आलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे. मात्र अजूनही या तालुक्यात दूध आणि साखर एकत्र यायला तयार नाही. दुधात साखर मिसळायला तयार नाही. कोल्हे, परजणे आणि विखे कुटुंबाला एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून विखे, कोल्हे आणि परजणे कुटुंब भविष्यात एकत्र येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
समाज आणि सभासदांचा उत्कर्ष हाच सहकाराचा उद्देश
दरम्यान, गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त १.५ मेगावॅट सौरउर्जा प्रकल्प, मिल्क क्लोरिफायर मशिन, कन्ट्युन्युअस खवा मेकींग मशिन, पाणी शुद्धीकरण यंत्रणेचे उद्घाटन व कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. यावेळी हरिभाऊ बागडे म्हणाले की, सहकार नीटनेटका चांगला नियोजनबद्ध केला तर तोटा होत नाही. 50 ते 60 वर्षांपासून सहकारातील अनेक उद्योग सुरू आहेत. त्यासाठी आपली भावना सहकार्याची असली पाहिजे. सहकारी संस्था अडचणीत येणार नाहीत. दूध उत्पादक शेतकरी, सभासद हा सहकारी संघाचा मालक असून सहकारात मोठे लक्ष ठेवून वागले पाहिजे. केवळ नफा मिळविणे हे सहकाराचे ध्येय नसून समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष हा सहकाराचा खरा उद्देश आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा