Video | ऋषभ पंतचं ‘Spiderman Stumping’ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
भारतीय क्रिकेट संघानं इंग्लंडच्या संघासोबत सुरु असणाऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. यादरम्यान, अनेक क्षणांनी क्रीडारसिकांचं लक्ष वेधलं.
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा 317 धावांनी पराभव केला. भारताने चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. आर अश्विन या सामन्याचा हिरो ठरला. तिथं पाहुण्या संघाच्या कामगिरीमध्येही काही खेळाडू चमकले. पण, त्यांना कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. इंग्लंडच्या संघाकडून मोईन अली हा अखेरचा खेळाडू तंबूत परतला.
कुलदीप यादवच्या चेंडूवर ऋषभ पंतनं अलीला स्टंपिंग घेत त्याला तंबूत माघार पाठवलं. भारतीय फिरकी गोलंदाजांना अलीच्या फटकेबाजीचा सामना करावा लागत असतानाच एकिकडे काहीशी चिंता निर्माण झाली. पण, अखेर कुलदीपनं अलीला ऑफसाईड स्टंपबाहेर चेंडू टाकला. अलीनं पुढे येत कवरला फटका मारण्यासाठीच तो चेंडू टाकला होता.
कुलदीपच्या या चेंडूचा अलीला अंदाज आला नाही, किंबहुना या चेंडूशी त्याचा संपर्कही झाला नाही. चेंडू फिरकी घेत असल्यामुळं तो पकडणं पंतलाही कठीण होतं. पण, हीच गोष्ट त्यानं त्याच्या अंदाजात साध्य केली. सोशल मीडियावर त्याचं हे अनोखं स्टंपिंग कमालीचं व्हायरल झालं.
एकिकडे यष्ठीरक्षणासाठी धोनीच्या कौशल्याचं कायमच कौतुक होत असतं, तिथंच दुसरीकडे भारतीय संघातील आणखी एक खेळाडू, म्हणजेच ऋषभ पंत याचीही हल्ली बरीच चर्चा होऊ लागली आहे.
And Kuldeep gets a rampaging Moen! Another superb Pant stumping, India win by 317 runs, level series! Ashwin, Rohit Sharma, Rishabh Pant, Axar Patel the stars! #IndiavsEngland #INDvsENG pic.twitter.com/1InoLKxHpE
— Writer_SnehithK (@away_idle) February 16, 2021
कशी होती भारताची कामगिरी
दुसर्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने इंग्लंडला आर अश्विनच्या शतकाच्या आणि 8 विकेट्सच्या जोरावर पराभूत केलं. भारताच्या शानदार गोलंदाजीसमोर 482 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ केवळ 164 धावांतच आटोपला. भारताकडून पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने 60 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. याशिवाय आर अश्विन तीन विकेट घेण्यास यशस्वी झाला आणि कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या.