Tata Mumbai Marathon : टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा अनोखं काहीतरी, महिला सरपंचही धावणार
Mumbai Marathon : राज्यभरात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या ज्यात कितीतरी गावात महिला सरपंच निवडून आल्या असून या सर्वजणी विकासाचे स्वप्न घेऊन टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत.
Women Sarpanchas in Tata Mumbai Marathon : नवीन वर्ष चालू झालं असून कितीतरी नव्या संकल्पांसह 2023 या वर्षाची सुरुवात जगभरात झाली आहे. आता मुंबई येथे 15 जानेवारी 2023 रोजी टाटा मुंबई मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon) पार पडणार असून विशेष म्हणजे राज्यातील विविध गावांतील ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीत या गाव-खेड्यातील महिला विकासाचे स्वप्न घेऊन धावणार आहेत. मुंबई मॅरेथॉनच्या दृष्टीने ही एक अद्भूत अशी "ड्रीम रन" असणार हे नक्की. गाव विकास प्रशिक्षण आणि महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी झटणारी आरएससीडी आणि पायाभूत लोकशाही सक्षमीकरणासाठी (Grassroots Democracy Platform) प्रयत्न करणारी "ईशाद"(ISHAD) या स्वयंसेवी संस्थांच्या प्रोत्साहनातून महिला सरपंचांचे हे स्वप्न साकार होणार आहे.
राज्यभरात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या ज्यात कितीतरी गावात महिला सरपंच निवडून आल्या. ज्यामुळे विविध गावांच्या विकासात आता महिला नेतृत्वही आपल्यापरिने मोलाचे योगदान देणार आहेत. ग्रामपंचायतींच्या कारभाराचा डोलारा खांद्यावर घेऊन आता या महिला पुढे जाणार आहेत. यावेळी स्थानिक विकासकामे, गरजा आणि निधीचा पारदर्शी उपयोग, या सर्व कामांमध्ये महिला सरपंच असताना यातून एक विरंगुळा म्हणून त्या टाटा मुंबई मॅरेथॉन या भव्य स्पर्धेतही सहभागी होतील. टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये एकूण 20 पंच सरपंच आणि नेतृत्वशील महिला धावणार आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे- सीमा पाचंगे, वर्षा मिडगुले ,प्रणया टेमकर, अर्जना पवार,शारदा गायधने , ऊमा माळी, अर्चना कांबळे,शर्मिला रामटेके,संगिता वेंदे ,अर्चना जतकर,रत्नमाला वैद्य, हर्षदा वाळके,मालती सगणे, सुनंदा मांदळे, सुरैय्या पठाण, नंदा गायकवाड, माया सोनागोती, समिना शेख, प्रज्ञा आवाडे आणि मयुरी लाड.
महिलांना केवळ प्रोत्साहनाची गरज
महाराष्ट्रात 73 व्या घटनादुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींबरोबरच महिलांना 50 टक्के आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमांचा स्वीकार करण्यात किंवा त्या आत्मसात करण्यात महिला नेहमीच तत्परता दाखवितात. त्यांना फक्त प्रोत्साहनाची गरज असते. हेच काम आरएससीडी आणि ईशाद सारख्या संस्था करत असून त्याच्यांच माध्यमातून आता या महिला सरपंच टाटा मॅरेथॉनसारख्या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
हे देखील वाचा-