T20 World Cup 2024 : आगामी टी 20 विश्वचषकातही रोहित शर्माच्या खांद्यावरच टीम इंडियाची धुरा, जय शाह यांची मोठी घोषणा
T20 World Cup 2024 : आगामी टी 20 विश्वचषकात रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शाह यांनी याबाबतची घोषणा केलीये. राजकोटमध्ये इंग्लंड आणि भारतादरम्यान (India VS England) कसोटी सामन्याला उद्या सुरुवात होणार आहे.
T20 World Cup 2024 : आगामी टी 20 विश्वचषकात रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शाह यांनी याबाबतची घोषणा केलीये. राजकोटमध्ये इंग्लंड आणि भारतादरम्यान (India VS England) कसोटी सामन्याला उद्या सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जय शाह यांनी ही घोषणा केली आहे. "2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात आपला पराभव झाला असला तरी टीम इंडिया चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली होती. भारताने सलग 10 सामने जिंकले. मला पूर्ण विश्वास आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यंदाचा टी-२० विश्वचषक जिंकण्यात यशस्वी होईल", असा विश्वास जय शाह यांनी व्यक्त केला.
उपकर्णधारपदी हार्दिक पंड्या
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या खांद्यावर विश्वचषकात उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे, असेही शाह यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडियमचे नाव बदलण्याची घोषणाही करण्यात आली. या स्टेडियमचे नाव आता निरंजन शाह स्टेडियम असे ठेवण्यात येणार आहे. माजी क्रिकेटपटू निरंजन शाह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शाह यांनी स्पष्ट केले. रोहित शर्माचा संघ टी-20 विश्वचषक जिंकण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास जय शाह यांनी व्यक्त केला आहे. जय शाह यांनी यावेळी गतवर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाच्या कामगिरीचे कौतुक करत आनंद व्यक्त केला. मात्र, वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
2022 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा प्रवास उपांत्य फेरीत संपला होता टीम इंडियाचा प्रवास
आगामी टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधार कोण असेल याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु होती. 2022 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा प्रवास उपांत्य फेरीत संपला होता. यानंतर रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या संघाची धुरा सांभाळत होता. पण जानेवारीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली 14 महिन्यांनंतर टी-20 संघात परतले. रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या T20 सामन्यातही शतक झळकावले. तेव्हापासून, रोहित शर्मा यंदाच्या T20 विश्वचषकात टीम इंडियाची धुरा सांभाळेल,अशी अपेक्षा होती. दरम्यान, रोहितच्या नेतृत्वात टीम इंडिया विश्वचषक खेचून आणणार का? याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
3 वर्षाच्या मॅक्सवेलचे क्रिकेट तुम्ही पाहिलय का? एकदा पाहा, तुमचा विश्वासही बसणार नाही