T20 WC Ind vs NZ: न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची अग्निपरीक्षा, भारताला आज जिंकणं आवश्यक अन्यथा रस्ता खडतर
IND vs NZ : T20 विश्वचषकात आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. टीम इंडियानं जर का हा सामना जिंकला तर सेमीफायनलसाठीचा भारताचा मार्ग सुकर होणार आहे,
IND vs NZ : T20 विश्वचषकात आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्ताननं भारत आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. पाकिस्ताननं न्यूझीलंडवर मिळवलेल्या विजयानं भारतासाठी एक संधी निर्माण झाली आहे. सुपर 12 फेरीच्या दुसऱ्या गटात आज न्यूझीलंडशी टीम इंडियाचा सामना होणार आहे. टीम इंडियानं जर का हा सामना जिंकला तर सेमीफायनलसाठीचा भारताचा मार्ग सुकर होणार आहे, जर या सामन्यात पराभव झाला तर मात्र भारताचा रस्ता खडतर होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी 7.30 वाजता हा सामना दुबईत होणार आहे.
T20 World Cup : शार्दुलला संधी नाहीच, पाकिस्तानविरोधातील टीम इडिया न्यूझीलंडविरोधात लढणार?
पाकिस्तानविरोधात उतरलेला संघ आज मैदानात उतरणार
पाकिस्तानविरोधातील सामन्यात आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी न करणाऱ्या खेळाडूंना पुढील सामन्यात बाहेरचा रस्ता दाखवला जाणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये सुरु झाली होती. यामध्ये सर्वात आघाडीचं नाव होतं हार्दिक पांड्या याचं. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्यामुळे गोलंदाजी करु शकत नाही, त्यामुळे पुढील सामन्यात त्याच्या जागी मुंबईकर शार्दुल ठाकूरला संधी दिली जाणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, सुत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या वृत्तानुसार, न्यूझीलंडविरोधात टीम इंडियाच्या संघात कोणताही बदल होणार नाही. पाकिस्तानविरोधात उतरलेला संघ रविवारी मैदानात उतरणार आहे.
लयीत नसलेल्या हार्दिकच्या जागी इशान किशनला संधी द्यावी अथवा अतिरिक्त गोलंदाज खेळवायचा असल्यास शार्दूलला स्थान द्यावे, असे अनेक जाणकारांनी सुचवले आहे. मात्र, भारतीय संघात कोणताही बदल होणार नसल्याचं समजतेय. त्यामुळे शार्दुल ठाकूरला अंतिम 11 मध्ये खेळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास शार्दुल ठाकूर तितका सक्षम नसल्याचं दिसतेय. भारतीय संघाच्या सेट-अपमध्ये शार्दुल फिट बसत नसल्यामुळे हार्दिकच्या जागी शार्दुल तुर्तास संधी मिळण्याची शक्यता कमीच वाटतेय. गोलंदाजीविषयी बोलायचं झाल्यास, शार्दुल ठाकूर विकेट घेण्यास सक्षम आहे. मात्र, तो प्रतिषटक 9 धावा देतो. दुसरीकडे हार्दिक पांड्याने नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे.