T20 World Cup : शार्दुलला संधी नाहीच, पाकिस्तानविरोधातील टीम इडिया न्यूझीलंडविरोधात लढणार?
T20 World Cup, IND vs NZ: मेंटॉर धोनीच्या रणनीतीला आदर्श माणून विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध खेळवलेल्या 11 जणांवरच पुन्हा विश्वास दर्शवण्याची दाट शक्यता आहे.
T20 World Cup, IND vs NZ: विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पाकिस्तानविरोधातील सामन्यात आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी न करणाऱ्या खेळाडूंना पुढील सामन्यात बाहेरचा रस्ता दाखवला जाणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये सुरु झाली होती. यामध्ये सर्वात आघाडीचं नाव होतं हार्दिक पांड्या याचं. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्यामुळे गोलंदाजी करु शकत नाही, त्यामुळे पुढील सामन्यात त्याच्या जागी मुंबईकर शार्दुल ठाकूरला संधी दिली जाणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, सुत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या वृत्तानुसार, न्यूझीलंडविरोधात टीम इंडियाच्या संघात कोणताही बदल होणार नाही. पाकिस्तानविरोधात उतरलेला संघ रविवारी मैदानात उतरणार आहे.
टीम इंडियाचा मेंटॉर असलेल्या धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज प्रमाणे भारतीय संघही निवडला जाणार आहे. मेंटॉर धोनीच्या रणनीतीला आदर्श मानून विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध खेळवलेल्या 11 जणांवरच पुन्हा विश्वास दर्शवण्याची दाट शक्यता आहे. संघाला पराभव मिळू अथावा विजय.. संघात फारसे बदल होणार नाहीत, असं सुत्रांनी सांगितलं. जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तरच संघात बदल होऊ शकतात, अन्यथा भारतीय संघात बदलाची शक्यता कमीच असल्याचं सांगितलं जातेय. युएईत झालेल्या आयपीएल 14 च्या उत्तरार्धात हार्दिकने एकही चेंडू टाकला नव्हता. पाकिस्तानविरोधातही हार्दिक आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे लयीत नसलेल्या हार्दिकच्या जागी इशान किशनला संधी द्यावी अथवा अतिरिक्त गोलंदाज खेळवायचा असल्यास शार्दूलला स्थान द्यावे, असे अनेक जाणकारांनी सुचवले आहे. मात्र, भारतीय संघात कोणताही बदल होणार नसल्याचं समजतेय. त्यामुळे शार्दुल ठाकूरला अंतिम 11 मध्ये खेळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास शार्दुल ठाकूर तितका सक्षम नसल्याचं दिसतेय. भारतीय संघाच्या सेट-अपमध्ये शार्दुल फिट बसत नसल्यामुळे हार्दिकच्या जागी शार्दुल तुर्तास संधी मिळण्याची शक्यता कमीच वाटतेय. गोलंदाजीविषयी बोलायचं झाल्यास, शार्दुल ठाकूर विकेट घेण्यास सक्षम आहे. मात्र, तो प्रतिषटक 9 धावा देतो. दुसरीकडे हार्दिक पांड्याने नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे.
भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar)जागी तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुलला संधी देण्यात यावी, असेही काही जाणकरांनी सांगितलं होतं. पण सुत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या वृत्तानुसार, भारतीय संघ भुवनेश्वर कुमारला डच्चू देण्याबाबत कोणताही विचार करत नाही. एका सामन्यावरुन या गोलंदाजाला परखणं चुकीचं असल्याचं संघाचं मत आहे. तसेच वरुण चक्रवर्तीच्या जागी अश्विनलाही संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण, विराट कोहली संघातील संतुलनात कोणताही बदल करण्याची शक्यता नाही.
स्पर्धेतील भारताचे वेळापत्रक
31 ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड
3 नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान
5 नोव्हेंबर: भारत वि स्कॉटलॅंड
नोव्हेंबर 8: नामिबिया वि भारत