एक्स्प्लोर
सचिनच्या वेड्या फॅनची खरी कहाणी!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 45 वा वाढदिवस. क्रिकेटचा देव सचिन आज 46व्या वर्षात पदार्पण करतोय.
मुंबई: वानखेडेपासून- रावळपिंडीपर्यंत, मेलबर्नपासून ते ऑकलँडपर्यंत जगभरातील क्रिकेटमैदानावर एक क्रिकेट फॅन दिसतो. संपूर्ण शरिरावर तिरंगा पेंट करून, त्यावर 10 तेंडुलकर असं लिहिलेलं असतं. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात भारताचा सामना असो, हा फॅन दिसतोच- दिसतो. या क्रिकेट फॅनचं नाव सुधीर कुमार गौतम उर्फ सुधीर गौतम होय.
सुधीर गौतमला कोणी क्रिकेटप्रेमी म्हणतं, तर कोणी क्रिकेटवेडं. पण सुधीर स्वत: सचिनप्रेमी आणि सचिनवेडा आहे. सुधीरकडे ना कोणता जॉब आहे, ना नियमित पगार. मात्र तो स्वत:चं एकच काम मानतो, ते म्हणजे मॅच पाहणं.
सुधीरने त्याच्या वडिलांसोबत कधी बोलणं किंवा गप्पा मारल्या आहेत, ते त्यालाही आठवत नाही. मात्र क्रिकेटच्या देवाची अर्थात सचिन तेंडुलकरची पहिली भेट तो कधीच विसरलेला नाही.
सचिनचा हा फॅन सध्या टीव्ही, रेडिओ, न्यूजपेपर, जाहिराती इत्यादी सर्व ठिकाणी झळकत असतो. कमाई शून्य असूनही, सुधीर जगभरात मॅच पाहण्यासाठी कसं काय पोहोचतो? सुधीरसाठी सचिन का देव आहे? सुधीरचं स्वप्न काय? त्याची ही रंजक कहाणी
मॅचसाठी तिकीट कलेक्टरची नोकरी सोडली-
क्रिकेटवेडा सुधीर आज जगभरातील मैदानात दिसतो. मात्र याच क्रिकेटच्या वेडापायी सुधीरने तीन नोकऱ्यांवर पाणी सोडलं आहे. सुधीर सर्वात आधी मुजफ्फपूर, बिहारच्या एका डेअरीमध्ये कामाला होता. इथे तो कलाकंदपासून- खव्यापर्यंत सर्व पदार्थ बनवण्यातील एक एक्स्पर्ट म्हणून ओळखला जात होता. मात्र त्याने ही नोकरी सोडली आणि मिळवलेल्या पैशातून पासपोर्ट बनवून घेतला.
यानंतर सुधीरने शिक्षण मित्र म्हणून काम केलं. ही नोकरी पार्ट टाईम होती. त्यामुळे सुधीर इंडियाची प्रत्येक मॅच पाहू शकत होता. त्याच्या या जॉबशी संबंधित एक ट्रेनिंग होतं. मात्र ते सोडून तो स्वत:ची सायकल घेऊन पाकिस्तानला गेला.
यानंतर 2005 मध्ये सुधीर रेल्वेची तिकीट कलेक्टरची परीक्षा पास झाला. त्याला मुलाखतीसाठी हैदराबादमध्ये बोलावण्यात आलं. मात्र त्याच दिवशी दिल्लीत भारत- पाकिस्तान यांच्यात वन डे मॅच होती. हाडाचा क्रिकेटप्रेमी असलेल्या सुधीरने मुलाखतीचं पत्र फाडून टाकलं आणि मॅचसाठी रवाना झाला.
सचिनच्या भेटीसाठी सायकलवरून निघाला
वर्ष 2003 मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात तिरंगी मालिका खेळवण्यात आली. त्यावेळी 1 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होता. हा सामना पाहाण्यासाठी सुधीर 8 ऑक्टोबरलाच मुंबईकडे सायकलवरून रवाना झाला. सुधीर 24 ऑक्टोबरला मुंबईत दाखल झाला. त्या दिवशी दिवाळी होती. सुधीर त्या दिवशी दिवसभर सचिनचं घर शोधण्यासाठी भटकत राहिला. यादरम्यान तो मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य प्रोफेसर रत्नाकर शेट्टी आणि लालचंद राजपूत यांची भेट झाली. सुधीरने त्यांच्याकडे सचिनला भेटण्याबाबत चौकशी केली.
पहिल्या भेटीत सचिनच्या पाया पडला
सचिन त्याच दिवशी हॉटेल ट्रायडेंटमध्ये येणार असल्याचं काही पत्रकारांनी सुधीरला सांगितलं. सुधीरने आपल्या सायकलवरून थेट हॉटेल ट्रायडेंट गाठलं. इथे तो सचिनची वाट पाहात थांबला. सचिन आल्याचं कळताच, सुधीरने ना सिक्युरिटीची तमा बाळगली, ना गर्दीची. तो थेट सचिनच्या दिशेने धावला आणि क्रिकेटच्या देवाचे पाय धरले. मग सचिननेही सुधीरला त्याच ठिकाणी आपल्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं.
सचिनच्या घरचं जेवण
सुधीर 29 ऑक्टोबरला सचिनला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला. त्यावेळी सचिनने त्याला स्वत:च्या घरचं जेवण दिलं. तसंच त्याच्याशी गप्पा मारून, त्याला पुढील सामन्याचे पासही दिले.
पोलिसांनी पकडलं, सचिनमुळे सुटका
सुधीरची सचिनसोबत झालेली पुढची भेट वेगळीच होती. सुधीरची पदवीची परीक्षा होती. सचिनने तेव्हा सुधीरला परीक्षा देऊन येण्यास सांगितलं. मात्र त्याचवेळी कटकमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे सामना होता. त्यामुळे सुधीरने विचार केला की, परीक्षा तर केव्हाही देता येईल पण आधी मॅच महत्त्वाची असं म्हणत, त्याने क्रिकेट ग्राऊंड गाठलं.
या मॅचमध्ये भारताची स्थिती नाजूक होती, मात्र सचिन मैदानात होता. सचिनने तेव्हा दमदार फलंदाजी केल्याने, सचिनच्या पाया पडण्यासाठी सुधीर थेट मैदानात धावला. मात्र यावेळी त्याला पोलिसांनी पकडलं. पण सचिनने त्याची सुटका केली. सचिनने त्याला असं करण्यास मनाई केली.
पुन्हा मैदानात धावला, थेट जेलमध्ये गेला
हैदराबादच्या मैदानात भारताचा सामना सुरू होता. यावेळी सचिनने शतक ठोकलं. त्यावेळीही सुधीर पुन्हा मैदानात धावला. मात्र पोलिसांनी त्याला पकडून थेट सिकंदराबाद पोलिस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं.
लग्न करणार नाही
सुधीरच्या कुटुंबियांनी त्याला लग्नासाठी आग्रह केला. मात्र सुधीरने लग्न करण्यास मनाई केली आहे. “माझा काही ठाव-ठिकाणा नाही. मला नोकरी नाही. माझं आयुष्य क्रिकेटला समर्पित आहे”, असं सुधीर म्हणतो.
बहिण- भावाच्या लग्नाला जाऊ शकला नाही
सुधीर नेहमीच भारताच्या कोणत्या ना कोणत्या मॅचमध्ये बिझी असतो. सुधीरच्या बहिणीचं लग्न होतं, त्यावेळी भारताचा सामना होता. त्यामुळे तो लग्नालाही गेला नाही. तीच स्थिती लहान भावाच्या लग्नावेळीही होती. सुधीर रक्षाबंधनला कधी श्रीलंकेत असतो, तर कधी न्यूझीलंडमध्ये.
कुटुंब आजही गरीब
सचिनचा वेडा फॅन असलेल्या सुधीरचं कुटुंब आजही गरीबच आहे. जुन्या भिंती, गळकं छत असं सुधीरचं घर. कुटुंबाची अशी परिस्थिती असताना, त्याला परदेशवारीसाठी पैसे येतात कुठून हा प्रश्न साहजिकच पडू शकतो.
सुधीरला या परदेशवाऱ्या अनेक टीव्ही चॅनेल्स, रेडिओ वा अन्य कोणीही घडवतं. त्याचा सर्व खर्च करण्यासाठी आता रांगा लागल्या आहेत. त्याबदल्यात सुधीर त्यांच्यासाठी प्रोग्राम करतो.
तेंडुलकरचे शूज सुधीरच्या पायात
सुधीर 2015 मध्ये वर्ल्डकपच्या सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया – न्यूझीलंडमध्ये होता. नेहमीप्रमाणे संपूर्ण शरिरावर तिरंगा रंगवून, हातात भला मोठा तिरंगा घेऊन सुधीर मैदानात दिसत होता. त्यावेळी सुधीरच्या पायात जे शूज होते, ते त्याला सचिनने गिफ्ट दिले होते.
सुधीरला या शूजच्या मॅचिंगची जर्सी, ट्रॅक पँट आणि कॅप रमेश माने यांनी दिले आहेत. माने हे मालिशवाले आहेत.
विना तिकीट प्रवास
सुधीर हा भारतातील सामने पाहाण्यासाठी ट्रेनने प्रवास करायचा. तो तिकीट काढत नव्हता. सुधीर कोलकात्यामध्ये मॅचसाठी जात असताना, त्याला टीटीने पकडलं. यावेळी सुधीरने टीटीला सचिन आणि स्वत:बद्दल सांगितलं. त्यानंतर टीटीने त्याला सोडून दिलं. मात्र त्यावेळी टीटी सुधीरला म्हणाला, तुझ्या अशाप्रकारामुळे तू सचिनचं नाव खराब करत आहे. त्यानंतर मात्र सुधीरने फुकटात प्रवास करणं बंद केलं.
पाकिस्तानचा बशीर चाचा, श्रीलंकेचा पर्सी, वेस्ट इंडिजचा ग्रेवी आणि आयर्लंडचा लॅरी हे क्रिकेटवेडे जगभरात प्रसिद्ध आहेत. सुधीर गौतमही असाच एक क्रिकेटवेडा. मात्र या सर्वांपेक्षा नक्कीच वेगळा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement