Roger Federer Retires: 20 ग्रँडस्लॅम जेतेपद, दिर्घकाळ अव्वल स्थानावर कब्जा; रॉजर फेडररच्या 10 मोठ्या विक्रमांवर एक नजर
Roger Federer Retires: टेनिस विश्वात गेली कित्येक वर्षे विविध विक्रम रचलेल्या रॉजर फेडररनं वयाच्या 41 व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला.
Roger Federer Retires: टेनिस विश्वात गेली कित्येक वर्षे विविध विक्रम रचलेल्या रॉजर फेडररनं वयाच्या 41 व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. गेली दोन दशके जगभरातील टेनिस रसिकांवर गारुड केलेल्या रॉजर फेडररनं गुरुवारी संध्याकाळी स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्त होण्याची घोषणा केली. तसेच पुढील आठवड्यात होणारी लेव्हर चषक स्पर्धा ही त्याच्या कारकीर्दीतील अखेरची असल्याचं स्पष्ट केलंय. फेडरर गेल्या वर्षांपासून दुखापतींच्या समस्यांशी झुंज देतोय, ज्यामुळं त्यानं टेनिसमधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. फेडररनं दोन दशकांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातलीय. दरम्यान, त्याच्या 10 मोठ्या विक्रमांवर एक नजर टाकुयात.
विक्रम
1) रॉजर फेडररनं आपल्या कारकिर्दीत 20 ग्रँड स्लॅम जेतेपदे पटकावली आहेत. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदे पटकावणाऱ्या टेनिसपटूंच्या यादीत स्पेनचा राफेल नदाल पहिल्या आणि सर्बियाचा नोवाक जोकोविच दुसऱ्या क्रमांकावर आहे.
2) रॉजर फेडररच्या नावावर 103 विजेतेपदांची नोंद आहे. टेनिसच्या ओपन एरामध्ये सर्वाधिक विजेतेपद पटकावणारा तो दुसरा खेळाडू आहे. तर, जिमी कॉर्नर्स (109) पहिल्या क्रमांकावर आहे.
3) फेडरर हा एकेरी स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं आपल्या कारकिर्दीत 1 हजार 251 सामने जिंकले आहेत. तर, 1 हजार 274 सामने जिंकणारा जिमी कॉर्नस अव्वल स्थानी आहे.
4) फेडरर हा दिर्घकाळ क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला. तो एकूण 237 आठवडे पहिल्या स्थानावर होता.
5) सर्वात वयस्कर खेळाडूचा नंबर-1 रँकिंगचा विक्रमही फेडररच्या नावावर आहे. वयाच्या 36 वर्षे 320 दिवसातही तो एटीपी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.
6) फेडररनं 8 विम्बल्डन पुरुष एकेरीचं जेतेपद पटकावलंय. कोणत्याही खेळाडूला आठ किंवा त्याहून अधिक वेळा विम्बल्डन पुरुष एकेरीचं जेतेपद जिंकता आलं नाही.
7) फेडररनं 2017 मध्ये वयाच्या 35 वर्षे 342 दिवसांत विम्बल्डनचे विजेतेपद पटकावलं होतं, असं करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू आहे.
8) फेडरर हा सलग 10 ग्रँडस्लॅम फायनल खेळणारा एकमेव खेळाडू आहे. 2005-06 मध्ये त्यानं हा विक्रम केला होता.
9) तीन कॅलेंडर वर्षात चारही ग्रँड स्लॅम फायनल खेळणारा रॉजर फेडरर हा एकमेव खेळाडू आहे. फेडररनं 2006, 2007 आणि 2009 मध्ये ही कामगिरी केली होती.
10) ग्रास कोर्टवर सर्वाधिक सलग 65 सामने जिंकण्याचा विक्रमही फेडररच्या नावावर आहे.
रॉजर फेडररची कारकिर्द
रॉजर फेडररनं त्याच्या कारकिर्दीत 6 वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचं खिताब जिंकलंय. यासह, फ्रेंच ओपन- 1, विम्बल्डन-8 आणि अमेरिकन ओपन स्पर्धेत 5 वेळा जेतेपद पटकावलंय. एकेरीत त्याच्या नावावर 103 जेतेपदांची नोंद आहे. तर, दुहेरीत एकूण 08 जेतेपद जिंकली आहेत.
हे देखील वाचा-