एक्स्प्लोर
मुंबईच्या सरफराजचं रणजी करंडकात ऐतिहासिक त्रिशतक, यूपीवर निर्णायक आघाडी, तर महाराष्ट्राचा आसामवर सनसनाटी विजय
मुंबईचा युवा फलंदाज सरफराज खाननं वानखेडे स्टेडियमवर एका ऐतिहासिक खेळीची नोंद केली. उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी करंडकाच्या साखळी सामन्यात सरफराज मुंबईचा तारणहार ठरला.
मुंबई : मुंबईचा युवा फलंदाज सरफराज खाननं वानखेडे स्टेडियमवर एका ऐतिहासिक खेळीची नोंद केली. उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी करंडकाच्या साखळी सामन्यात सरफराज मुंबईचा तारणहार ठरला. त्याने या सामन्यात नाबाद 301 धावांची खेळी करुन मुंबईला पहिल्या डावात निर्णायक आघाडी मिळवून दिली.
मुंबई आणि उत्तर प्रदेश संघांमध्ये वानखेडेवर झालेल्या रणजी करंडकाच्या या सामन्यात धावांचा अक्षरश: पाऊस पडला. फलंदाजीसाठी पोषक ठरलेल्या वानखेडेवरच्या खेळपट्टीवर उत्तर प्रदेशने उपेंद्र यादवचं द्विशतक आणि अक्षदीप नाथच्या शतकाच्या जोरावर 625 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर खेळताना मुंबईची 4 बाद 128 अशी अवस्था झाली असताना सरफराज खान फलंदाजीला उतरला. आणि त्यानं सिद्धेश लाड (98), कर्णधार आदित्य तरे (97) आणि शम्स मुलानीसह (65) महत्वाच्या भागीदाऱ्या साकारुन मुंबईला संकटातून सहीसलामत बाहेर काढलं. मुंबईनं आपला पहिला डाव सात बाद 688 धावांवर घोषित केला.
सरफराजनं 391 चेंडूंचा सामना करताना 30 चौकार आणि आठ षटकारांसह नाबाद 301 धावा फटकावल्या. रणजी करंडकाच्या इतिहासात त्रिशतक झळकावणारा सरफराज हा भारताचा आजवरचा 40 वा तर मुबईचा सातवा फलंदाज ठरला. रणजी करंडकात याआधी मुंबईच्या रोहित शर्मानं 2009 साली त्रिशतक ठोकलं होतं. त्यानंतर अकरा वर्षांनी सरफराजनं मुंबईकडून त्रिशतक ठोकण्याचा पराक्रम गाजवला.
मुंबईचे त्रिशतकवीर (खेळाडू - धावा - वर्ष)
1. विजय मर्चंट - नाबाद 359 (1943)
2. अजित वाडेकर - 323 (1967)
3. सुनील गावस्कर - 340 (1982)
4. संजय मांजरेकर - 377 (1991)
5. वासिम जाफर - 314 (1996)
6. वासिम जाफर - 301 (2009)
7. रोहित शर्मा - नाबाद 309 (2009)
8. सरफराज - नाबाद 301 (2020)
महाराष्ट्राची आसामवर सनसनाटी मात
आशय पालकरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रणजी करंडकाच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने आसामवर 218 धावांनी सनसनाटी विजय साजरा केला. या सामन्यात जय पांडेच्या शतकी खेळीमुळे महाराष्ट्राने आसामला 297 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर वेगवान गोलंदाज आशय पालकरनं 42 धावांत सहा फलंदाजांना माघारी धाडून आसामचा दुसरा डाव अवघ्या 78 धावांत गुंडाळला. मुकेश चौधरीने तीन विकेट्स घेऊन त्याला सुरेख साथ दिली. विशेष म्हणजे या सामन्यात आसामने पहिल्या डावात आघाडी घेतली होती. पण जय पांडे आणि आशय पालकरच्या निर्णायक कामगिरीमुळे महाराष्ट्रानं या सामन्यात मुसंडी मारली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement