(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी विनेश फोगाटविरुद्ध भिडणार; कोण आहे अमेरिकेची सारा हिल्डब्रँड?
Vinesh Phogat Paris Olympics 2024: आज रात्री 10 वाजता विनेश फोगाटचा अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडसोबत अंतिम सामना होईल.
Vinesh Phogat Paris Olympics 2024: भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली भारतीय ठरली. आज रात्री 10 वाजता विनेश फोगाटचा अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडसोबत अंतिम सामना होईल.
विनेश फोगाटविरुद्ध सुवर्णपदकासाठी भिडणारी सारा ॲन हिल्डब्रँड कोण?
अंतिम सामन्यात विनेश फोगाटसमोर अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडचे तगडे आव्हान असणार आहे. 2020 मध्ये खेळल्या गेलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सारा हिल्डब्रँडने 50 किलो गटात कांस्यपदक जिंकले होते. याशिवाय तिने चार वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या देशाला पदक मिळवून दिले. 2018 मध्ये बुडापेस्ट आणि 2021 मध्ये ओस्लो येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप सामन्यांमध्ये हिल्डब्रँडने अनुक्रमे 53 आणि 50 किलो गटात दुसरे स्थान मिळवून रौप्य पदक जिंकले आहे. त्याचप्रमाणे त्याने 2022 आणि 2023 मध्ये बेलग्रेड येथे खेळल्या गेलेल्या जागतिक अजिंक्यपद सामन्यात 50 किलो गटात तिसरे स्थान मिळवून कांस्य पदक पटकावले. तर पेरूच्या लिमा येथे झालेल्या 2019 पॅन अमेरिकन गेम्समध्ये तिने महिलांच्या 53 किलो गटात सुवर्णपदक जिंकले . तसेच पॅन अमेरिकेच्या चॅम्पियनशिपमध्ये सारा अॅन हिल्डब्रँड हिने सातवेळा सुवर्णपदक जिंकले आहे.
अपराजित यूई सुसाकीला विनेश फोगाटने लोळवलं-
विनेश फोगटनं उपांत्य फेरीत जपानच्या दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आणि वर्ल्ड चॅम्पियन युई सुसाकी चा 3-2 असा पराभव केला. विनेश फोगटनं युई सुसाकीला पराभूत करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा उलटफेर केला आहे. विनेश फोगट आणि युई सुसाकी हिचा सामना जेव्हा सुरु झाला तेव्हा अनेकांना युई सुसाकी ही विजयाची प्रमुख दावेदार वाटत होती. युई सुसाकीनं तिच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकही पराभव स्वीकारला नव्हता. राष्ट्रीय करिअरमध्ये तिला तीन वेळा पराभव स्वीकारावा लागला होता. जपानच्या इरी युकी हिनं तिचा पराभव केला होता. मात्र, युई सुसाकीचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आतापर्यंत एकही पराभव झाला नव्हता विनेश फोगटनं यूकी सुसाकीला 3-2 असं पराभूत करत इतिहास रचला. युई सुसाकीला पराभूत करणं आंतरराष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत कुणालाही जमलेलं नव्हतं. भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिनं ती कामगिरी करुन दाखवली.
संबंधित बातमी:
फायनलमध्ये धडक मारल्यानंतर विनेश फोगाटचा व्हिडीओ कॉल, आई म्हणाली, बेटा गोल्ड लेके आना है!