Tokyo Olympic 2020 : ठरलं! टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार नोवाक जोकोविच; ट्वीट करत दिली माहिती
टेनिस स्टार नोवाक जोकोविच टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. यासंदर्भात त्यानं ट्वीट करत माहिती दिली आहे.
Tokyo Olympic 2020 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट टेनिस स्टार नोवाक जोकोविच सहभागी होणार की नाही? याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. अशातच आता प्रश्नांचं उत्तर स्वतः जोकोविचनं दिलं आहे. गुरुवारी नोवाक जोकोविचनं आपण टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार असल्याची माहिती दिली. आयोजकांच्या वतीनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. म्हणजेच, यंदा ऑलिम्पिक प्रेक्षकांविनाच पार पडणार आहे. तसेच खेळाडूंच्या स्टाफची संख्याही कमी करण्यात आली आहे. यासर्व कारणांमुळे जोकोविचच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होतं. अशातच आता स्वतः जोकोविचनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार असल्याचं जाहीर करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार नोवाक जोकोविच
जोकोविचनं इंग्रजीत एक ट्वीट केलं असून या ट्वीटमार्फत टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार असल्याचं त्यानं जाहीर केलं आहे. जोकोविचनं ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "मी टोकियो ऑलिम्पिकसाठी विमानाचं तिकिट बुक केलं आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी टीम सर्बियामध्ये मी गर्वानं सहभागी होणार आहे." जोकोविचनं आणखी एक ट्वीट करत लिहिलं की, "मी मोठ्या गर्वानं टोकियो ऑलिम्पिकसाठी सामना बांधायला घेतलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या सामन्यांमध्ये पदक जिंकण्यासाठी आपल्या राष्ट्रीय संघासोबत भागीदारी करणार आहे. सर्बियासाठी खेळणं माझ्यासाठी नेहमीच आनंददायी आणि प्रेरणादायी ठरलं आहे. सर्वांना आनंद देण्यासाठी मी उत्तम प्रदर्शन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपल्याला जायला हवं."
नोवोक जोकोविचने रचला इतिहास, 20 व्या ग्रँड स्लॅमवर कोरलं नाव
विम्बल्डन 2021 च्या अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने इटलीच्या मॅटिओ बेरेटीनीचा पराभव करून इतिहास रचला. नोवाक जोकोविचने आपल्या कारकीर्दीतील 20 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकलं. जोकोविचने तीन तास 23 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात इटलीच्या बेरेटीनीचा 6-7 (4), 6-4, 6-4, 6-3 असा पराभव केला. विम्बल्डनमधील हे त्याचे सलग तिसरे विजेतेपद आहे.
तब्बल साडेतीन तास रंगलेल्या पुरुष एकेरीच्या या सामन्यात माटिओ बेरेटिनीने पहिल्या सेटमध्ये जोकोविचला चांगलीच लढत दिली. वेगवान सर्व्हिसेसमुळे बेरेटीनीने पहिला सेट आपल्या नावावर केला. त्यानंतर पुढच्या तीन सेटमध्ये जोकोविचने आपला अनुभव पणाला लावत बेरेटीनीवर आघाडी मिळवली. शेवटच्या सेटमध्येही बेरेटिनीने आपल्या वेगवान सर्व्हिसेस सुरुच ठेवली. मात्र, तरीही जोकोविचने अनुभवाच्या जोरावर ही लढत आपल्या नावावर केली.
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेला बेरेटिनी विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारा इटलीचा पहिला टेनिसपटू आहे. त्याने जेतेपदाला गवसणी घातली असती, तर एड्रियाने पानाट्टा यांच्यानंतर ग्रँडस्लॅम (1976, फ्रेंच) जिंकणारा तो इटलीचा दुसरा टेनिसपटू ठरला असता. मात्र, जोकोविचने त्याला नमवत स्वतःचं स्वप्न पूर्ण केलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :