(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Paris Olympics 2024: जपान अव्वल, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर; पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकांच्या यादीत भारत कितव्या स्थानावर?
Paris Olympics 2024: ऑस्ट्रेलिया पदकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने 4 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक जिंकले आहेत.
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024)च्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस जपानने 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकांसह अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया पदकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने 4 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक जिंकले आहेत. 3 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्य पदाकांसह अमेरिका तिसऱ्या स्थानावर आहे. फ्रान्स 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह चौथ्या क्रमांकावर आहे. भारत एक कांस्य पदकांसह 22 व्या स्थानावर आहे. भारताच्या मनू भाकरने नेमबाजीत 28 जुलै रोजी भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे, ज्यामुळे पदकतालिकेत भारताला मानाचं स्थान मिळालं आहे.
भारत 22 व्या स्थानावर-
पॅरिस ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य पदक जिंकून पदकतालिकेत भारताचे खाते उघडले आहे. एका कांस्य पदकासह भारत सध्या 22 व्या स्थानावर आहे. आज भारतीय खेळाडूंकडून पदकाची आशा आहे.
1. जपान- 7 पदके (4 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य)
2. ऑस्ट्रेलिया - 6 पदके (4 सुवर्ण, 2 रौप्य)
3. अमेरिका- 12 पदके (3 सुवर्ण, 6 रौप्य, 3 कांस्य)
4. फ्रान्स- 8 पदके (3 सुवर्ण, 3 रौप्य, 2 कांस्य)
22. भारत- 1 पदक (1 कांस्य)
भारताचे अनेक खेळाडू अंतिम फेरीत-
10 मीटर एअर रायफल नेमबाजीच्या अंतिम फेरीत रमिता इलावेनिल वालारिवन आणि रमिता जिंदाल यांनी प्रवेश केल्यामुळे नेमबाजीत भारतासाठी हा चांगला दिवस होता. दुसरीकडे, संदीप सिंग पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेतून बाहेर आहे, पण अर्जुन बबुताने 630.1 गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. निखत झरीन, मनिका बत्रा, पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय यांनी आपापल्या खेळांच्या पुढील फेरीत प्रवेश केला आहे. उद्या म्हणजेच 29 जुलैलाही भारतीय खेळाडूंना पदकाच्या शर्यतीत राहायचे आहे.
पाहा आजचे (29 जुलै) भारताचे ऑलिम्पिकचे वेळापत्रक....
तिरंदाजी-
पुरुष सांघिक उपांत्यपूर्व फेरी: तरुणदीप राय, धीरज बोम्मादेवरा, प्रवीण जाधव - संध्याकाळी 6.30
बॅडमिंटन-
पुरुष दुहेरी (ग्रुप स्टेज): सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध मार्क लॅम्सफस आणि मार्विन सीडेल (जर्मनी) - दुपारी 12 वा.
महिला दुहेरी (ग्रुप स्टेज): अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो विरुद्ध नामी मत्सुयामा आणि चिहारू शिदा (जपान) - दुपारी 12.50 वा.
पुरुष एकेरी (ग्रुप स्टेज): लक्ष्य सेन विरुद्ध ज्युलियन कॅरेजी (बेल्जियम) - संध्याकाळी 5.30
शूटिंग-
10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक पात्रता: मनू भाकर आणि सरबज्योत सिंग, रिदम सांगवान आणि अर्जुन सिंग चीमा - दुपारी 12.45 वा.
पुरुष ट्रॅप पात्रता: पृथ्वीराज तोंडैमन - दुपारी 1:00 वा
10 मीटर एअर रायफल महिला अंतिम फेरी: रमिता जिंदाल - दुपारी 1.00 वा
10 मीटर एअर रायफल पुरुषांची अंतिम फेरी: अर्जुन बबुता - दुपारी 3.30 वा
हॉकी-
पुरुषांचा पूल ब सामना: भारत विरुद्ध अर्जेंटिना - दुपारी 4.15
टेबल टेनिस-
महिला एकेरी (32 ची फेरी): श्रीजा अकुला विरुद्ध जियान झेंग (सिंगापूर) - रात्री 11.30