Vinesh Phogat : न्यायासाठी दिल्लीच्या रस्त्यावर फरफटली, तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये हुलकावणी; अपील होण्याची शक्यता कमीच!
विनेशचे वजन 100 ग्रॅमपेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्याने ऑलिम्पिक महिला कुस्तीतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. संसदेतही रणकंदन सुरु झालं आहे.
Vinesh Phogat : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला निर्धारित श्रेणीत जास्त वजन असल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडावं लागलं आहे. विनेश 50 किलो गटात खेळते. तथापि, बुधवारी विनेशचे वजन 100 ग्रॅमपेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्याने ऑलिम्पिक महिला कुस्तीतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. संसदेतही रणकंदन सुरु झालं आहे. विनेशविरोधात कट करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांकडून होत आहे.
निर्णयाविरोधात अपील होण्याची शक्यता कमीच
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने विनेशच्या अपात्रतेला दुजोरा दिला आहे. आज रात्री होणाऱ्या 50 किलो गटातील महिला कुस्तीची अंतिम फेरी ती खेळू शकणार नाही. पदकही मिळणार नाही. दरम्यान, दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार सर्वात कठीण गोष्ट म्हणजे या निर्णयावर अपीलही करता येत नाही. विनेश पहिल्यांदाच 50 किलो गटात खेळत होती. यापूर्वी ती 53 किलोमध्ये खेळायची. मात्र, तो वजनगट नसल्याने वजन कमी केलं होतं.
निकालानंतर विनेशची तब्येत बिघडली
ऑलिम्पिकमधून बाद ठरवण्यात आल्यानंतर विनेश फोगटची प्रकृती खालावली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विनेश आणि तिच्या प्रशिक्षकांना जास्त वजनाबाबत मंगळवारी रात्री माहिती मिळाली होती. यानंतर विनेशला रात्रभर झोप लागली नाही आणि तिचे वजन निर्धारित श्रेणीत आणण्यासाठी ती जॉगिंग, स्किपिंग आणि सायकलिंगसारखे व्यायाम करत राहिली. विनेशने तिचे केस आणि नखे देखील कापले आहेत. एवढे करूनही वजन कमी झाले नाही. भारतीय संघाने विनेशला आणखी काही वेळ देण्याची मागणी केली होती, मात्र त्यांची मागणी ऐकली गेली नाही.
IOA म्हणाले, रात्रभर प्रयत्न करूनही वजन काही ग्रॅमने वाढले
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने सांगितले की, विनेश फोगटला जास्त वजनामुळे महिला कुस्तीच्या 50 किलो गटात अपात्र ठरवण्यात आले हे अत्यंत खेदजनक आहे. रात्रभर प्रयत्न करूनही सकाळी त्याचे वजन काही ग्रॅम 50 किलोपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले. भारतीय संघाकडून याबाबत सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही. विनेशच्या गोपनीयतेचा आदर करावा ही विनंती. आम्ही आगामी स्पर्धांवर लक्ष केंद्रित करू इच्छितो.
ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू
विनेश मंगळवारी 50 किलो कुस्ती ऑलिम्पिकमध्ये 3 सामने जिंकून अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. तिने उपांत्यपूर्व फेरीत क्यूबाच्या कुस्तीपटू गुझमन लोपेझचा, उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा आणि प्री-क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या विश्वविजेत्या युई सुसाकीचा 3-2 असा पराभव केला. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास तिला सुवर्णपदकासाठी अमेरिकन कुस्तीपटू साराह ॲन हिल्डरब्रँडशी मुकाबला करायचा होता.
मंगळवारचा पहिला सामना
प्री-क्वार्टर फायनलमध्ये वर्ल्ड चॅम्पियन युई सुसाकीचा (जपान) 3-2 असा पराभव केला. यानंतर तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली.
मंगळवारचा दुसरा सामना
उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनियन कुस्तीपटू ओक्साना लिवाचचा पराभव केला. या विजयासह विनेशने उपांत्य फेरी गाठली होती.
मंगळवारचा तिसरा सामना
उपांत्य फेरीत क्युबाच्या गुझमन लोपेझचा पराभव केला. ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली.
टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव
विनेश फोगटचे हे तिसरे ऑलिम्पिक आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमधून ती दुखापतीमुळे बाहेर होती. यानंतर 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशने तिचा एकही सामना गमावला नाही. मंगळवारी अंतिम फेरी गाठल्यानंतर पदक निश्चित मानले जात होते.
जेव्हा विनेशवर बंदी घालण्यात आली
2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकनंतर अनुशासन भंग केल्याबद्दल विनेशला भारतीय कुस्ती महासंघाने निलंबित केले होते. ऑलिम्पिक गावात आपल्या भारतीय संघसहकाऱ्यांसोबत प्रशिक्षण घेण्यास नकार दिला आणि ऑलिम्पिकमध्ये अधिकृत भारतीय किट घातलं नव्हतं. यावर फोगटने माफी मागितली होती.
बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आघाडी उघडली
विनेशने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता, त्यामुळे देशात मोठी चळवळ उभी राहिली होती. ऑलिम्पिक निवड चाचण्यांबाबतही वाद निर्माण झाले होते. या सर्व वादानंतरही विनेशने ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित केले आणि फायनलपर्यंत मजल मारली होती. विनेशच्या प्रबळ इच्छाशक्तीचा हा पुरावा आहे. तीन राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या