गीता पठण करून ध्येयाचे धडे, कृष्ण-अर्जुनाची सोबत, प्रशिक्षकांना श्रेय; मनू भाकरच्या विजयाची त्रिसूत्री
Manu Bhaker Wins Bronze Medal Paris Olympics 2024: भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे.
Manu Bhaker Wins Bronze Medal Paris Olympics 2024: पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत (Paris Olympics 2024) भारताच्या मनू भाकरने (Manu Bhaker) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे.
फायनलमध्ये मनू भाकरचा स्कोर
पहिली 5 शॉट सीरीज: 10.6, 10.2, 9.5, 10.5, 9.6, एकूण 50.4
दुसरी 5 शॉट मालिका: 10.1, 10.3, 9.6, 9.6, 10.3, एकूण: 49.9
उर्वरित शॉट्स: 10.5, 10.4, 9.8, 9.8, 9.9, 10.2, 10.1, 10.2, 10.1, 10.0, 10.1,10.3
पॅरिस ऑलिम्पिकमधली कांस्यपदक विजेती नेमबाज मनू भाकरची प्रतिक्रिया-
-ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न मी नेहमीच पाहात होते. ते मिळेल की नाही, याची खात्री नव्हती. पण अखेर ते स्वप्न आज साकार झालं.
-याक्षणी माझा आनंद गगनात मावेनासा झालाय. कारण मी देशासाठी, आपल्या साऱ्यांसाठी आज पदक जिंकू शकले.
-मी सध्या गीतापठण खूप करते. कर्म पे ध्यान दो, फल की चिंता मत करो, ही गीतेतून मिळणारी सर्वात महत्त्वाची शिकवण आहे. काल संध्याकाळी फायनलमधलं स्थान पक्कं झाल्यापासून आज अखेरचा लक्ष्यवेध करेपर्यंत माझ्या डोक्यात तोच विचार होता की, कर्म पे ध्यान दो, फल की चिंता मत करो...
-कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं, तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं...
-माझ्या कामगिरीत प्रशिक्षक जसपाल राणांचा मोलाचा वाटा. त्यांनीही माझ्याइतकाच घाम गाळला आणि रक्त आटवलं. मी त्यांच्यासाठी कृतज्ञ आहे.
-जसपाल राणा यांची सरावादरम्यान मला एक लक्ष्य देण्याची पद्धत आहे. त्यांनी दिलेल्या लक्ष्याइतका माझा स्कोर झाला नाही, की ते मला ज्या देशात असू, तिथल्या चलनात दंड करायचे. मग तेवढ्या रकमेच्या दंडातून मला सामाजिक कार्य करणं भाग असायचं. ती रक्कम कधी ४० युरो, तर कधी ४०० युरो असायची.
-टोकियोत माझ्या पिस्टलमधल्या तांत्रिक दोषानं मला खूप मोठा धडा शिकवला. कदाचित तो माझा बेजबाबदारपणा असावा. आयुष्यात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जिंकता येत नसतं.
-कधी कधी तुम्ही अनुभवातून शिकतही असता आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या धड्यातून मी खूप काही शिकले.
-काल रात्री शांत झोप लागली. कारण पदक मिळेल की नाही, याचा मी विचार करत नव्हते. आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. हिंमत सोडायची नाही, एवढाच मी मनाशी निश्चय केला होता.
-टोकियो ऑलिम्पिकनंतर मी खूप धार्मिक झाली आहे. पण अजिबात कट्टर नाही. मी देवाला मानते. आपल्यासभोवती असलेली उर्जा आपल्याला मार्ग दाखवत असते. देवानं ही सृष्टी घडवली. तुम्हा आम्हाला घडवलं. त्याच्यावर आपल्याला विश्वास असायला हवा.