Neeraj Chopra: 'माझ्या वक्तव्याला आपल्या अजेंड्याचं माध्यम बनवू नका', ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचं आवाहन
भारताला सुवर्णपदक जिंकून देत नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) देशाची मान उंचावली खरी मात्र काही लोकांमुळं त्याला एक व्हिडीओ जारी करत आवाहन करावं लागलं आहे.
मुंबई : ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव सुरु असताना दुसरीकडे त्याला काहीजण ट्रोल करत असल्याचं समोर आलं आहे. भारताला सुवर्णपदक जिंकून देत त्यानं देशाची मान उंचावली खरी मात्र काही लोकांमुळं त्याला एक व्हिडीओ जारी करत आवाहन करावं लागलं आहे.
Neeraj Chopra Instagram : गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ
नीरज चोप्रानं आज एक व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे की, माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, माझ्या वक्तव्याला आपल्या घाणेरड्या अजेंड्यांना पुढं नेण्याचं माध्यम बनवू नका. स्पोर्ट्स आम्हाला एकजुटीनं एकमेकांसोबत राहायला शिकवतं आणि काही कमेंट करण्याआधी खेळाचे नियम जाणून घेणं गरजेचं असतं, असं त्यानं म्हटलं आहे.
मेरी आप सभी से विनती है की मेरे comments को अपने गंदे एजेंडा को आगे बढ़ाने का माध्यम न बनाए। Sports हम सबको एकजूट होकर साथ रहना सिखाता हैं और कमेंट करने से पहले खेल के रूल्स जानना जरूरी होता है 🙏🏽 pic.twitter.com/RLv96FZTd2
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) August 26, 2021
व्हिडीओत नीरजनं काय म्हटलंय
पाकिस्तानी भालाफेकपटूने त्याचा भाला वापरल्यावरुन काही जणांनी कमेंट्स केल्या होत्या. त्यावर नीरजनं स्पष्टीकरण दिलं आहे. नीरज म्हटलं आहे की, सर्वात आधी आपलं आभार व्यक्त करतो की आपण इतकं प्रेम दिलं, सपोर्ट केला. खूप चांगलं वाटत आहे. सोबतच एक गोष्ट सांगू इच्छितो की, आता एक मुद्दा उठत आहे की, जेवलिन थ्रोच्या आधीपाकिस्तानच्या अरशद नदीमकडे माझा जेवलिन होता, त्याच्याकडून मी जेवलिन मागितलं, असं मी एका मुलाखतीत म्हटलं होतं. या गोष्टीचा आता मोठा इशू केला जात आहे. मात्र आम्ही सगळे खेळाडू आमचे वैयक्तिक जेवलिन तिथं ठेवतो. तिथं आम्ही एकमेकांचे जेवलिन घेत असतो. आम्ही एकमेकांचे जेवलिन वापरु शकतो, असा नियम आहे. त्यावेळी अरशद जेवलिन घेऊन त्याच्या थ्रोची तयारी करत होता. मी त्यावेळी माझ्या थ्रो साठी त्याच्याकडे जेवलिन मागितला. याला काही लोकांनी मोठा मुद्दा बनवला आहे. माझा वापर करुन याचा मुद्दा बनवला आहे. आम्ही सर्व खेळाडून आपापसात मिळून मिसळून राहतो, त्यामुळं अशी वक्तव्य करु नका, ज्यामुळं आम्हाला वाईट वाटेल, असं नीरजनं म्हटलं आहे.