National Games : गोव्यातील राष्ट्रीय खेळ स्पर्धेचा बोजवारा, स्टेडियमध्ये पाणी अन् भिंतीला गळती; 750 कोटी रुपये पाण्यात
National Games in Goa: गोव्यात 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान मूलभूत सेवांचा अभाव असल्याचं दिसून येतंय. खेळाडूंनी सुविधा नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
पणजी: गोव्यात सध्या राष्ट्रीय खेळ 2023 (National Games) सुरू आहे, मात्र याच्या आयोजनात गोवा सरकार कमी पडलंय असंच म्हणावं लागेल. कारण श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमची जी दृश्यं समोर आली आहेत, त्यामध्ये भिंती गळताना दिसतायत. एवढंच नाही तर अॅथलेटिक स्टेडियममध्ये तर चक्क पाणी भरलं. राष्ट्रीय खेळ स्पर्धेसाठी 750 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यातील बहुतांश निधी हा पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात आला. मात्र तरीही जर खेळाडूंची इतकी गैरसोय होणार असेल तर याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गोवा काँग्रेसनं केली आहे.
गोव्यात 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. पण या स्पर्धेत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं चित्र आहे, त्यामुळे गोवा सरकारवर आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर मोठी टीका होत आहे.
गोव्यात सुरू असलेल्या 37व्या राष्ट्रीय खेळांना पायाभूत सुविधांमध्ये बिघाड आणि लॉजिस्टिक समस्यांचा फटका बसला आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये थोड्या पावसात गळती झाली आणि बांबोलीम येथील अॅथलेटिक स्टेडियम जलद भरून गेले. राष्ट्रीय खेळांसाठी अंदाजे 750 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आलं होता, ज्यापैकी बहुतेक निधी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि नूतनीकरणासाठी देण्यात आला आहे.
गोवा काँग्रेसचे सरचिटणीस कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी स्थळे पुरेशा प्रमाणात तयार आहेत याची खात्री करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे असा आरोप करत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
सुरक्षेला गंभीर धोका निर्माण
विरोधी पक्षाने या प्रकरणी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. इनडोअर स्टेडियममधील कमानी (आधार खांब) कोसळणे, खांब तुटणे आणि पावसात छताला गळती यांसारखी उदाहरणे या कार्यक्रमातील कथित भ्रष्टाचाराचा पुरावा आहेत. या घटनांमुळे राज्य सरकारच्या प्रतिष्ठेला नुकतेच ठेच पोहोचली नसून सहभागी खेळाडू आणि अधिकारी यांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे असं विरोधी पक्ष काँग्रेसने म्हटलं आहे.
'गोवा सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव'
पायाभूत सुविधांच्या समस्यांव्यतिरिक्त गोव्यातील G20 बैठकीसाठी खरेदी केलेल्या दहाहून अधिक नवीन इलेक्ट्रिक बसेस राष्ट्रीय खेळांदरम्यान खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या वाहतुकीसाठी वापरता आल्या असत्या. पण त्याचा वापर न होता त्या तशाच पडून असल्याने सरकारकडे नियोजनाचा आणि दूरदृष्टीचा अभाव असल्याचं लक्षात येतंय अशी टीका काँग्रेसने केली आहे.
ही बातमी वाचा: