MS Dhoni Retires: महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास
MS Dhoni Retirement Announcement: भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज (15 ऑगस्टला) महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनी आयपीएल खेळत राहणार आहे. धोनीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली.
View this post on InstagramThanks a lot for ur love and support throughout.from 1929 hrs consider me as Retired
धोनीनं एक क्रिकेटर आणि एक कर्णधार या नात्यानं भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं आहे. 2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, 2011 सालचा वन डे विश्वचषक, 2012 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, याच कालावधीत कसोटी क्रमवारीतला नंबर वन ही सारी कामगिरी म्हणजे कर्णधार म्हणून धोनीच्या यशाचा परमोच्च बिंदू होता. त्याच वेळी एक फलंदाज आणि तेही अखेरच्या षटकांत विजयी घाव घालणारा फलंदाज म्हणून धोनीचं कर्तृत्व खूप मोठं होतं. त्यानं 15 वर्षांच्या कारकीर्दीत 350 वन डे सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या खात्यात 10 शतकं आणि 73 अर्धशतकांसह 10 हजार 773 धावा जमा आहेत. धोनीनं 98 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये 37.60 च्या सरासरीनं 1617 फटकावल्या आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याचा स्ट्राईक रेट तर तब्बल 126.13 आहे. ही सारी कामगिरी लक्षात घेऊनच धोनीला कॅप्टन कूल आणि मॅचफिनिशर या उपाधी त्याला मानानं बहाल करण्यात आल्या होत्या.
पण 2019 सालच्या विश्वचषकानं धोनीचा तो सारा रुबाब आता इतिहासजमा झाल्याचं दाखवून दिलं. धोनीला त्या विश्वचषकात एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागला. मॅचफिनिशर म्हणून विजयी घाव घालण्याच्या त्याच्या क्षमतेलाही ओहोटी लागल्याचं विश्वचषकातच स्पष्ट झालं. त्यामुळं या विश्वचषकानंतर झाकली मूठ सव्वा लाखाची या न्यायानं धोनी गेले सहा महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला.