Virat Kohli: मोठी बातमी, विराट कोहलीच्या जिवाला धोका? सराव सत्र आणि पत्रकार परिषद रद्द...आरसीबीचा महत्त्वाचा निर्णय
RR vs RCB, IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आजच्या मॅचपूर्वीचं सराव सत्र आणि पत्रकार परिषद रद्द केली आहे. तर, राजस्थाननं पत्रकार परिषद रद्द केली.
अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (Roayl Challengers Bengaluru) सुरक्षेच्या कारणानं राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या एलिमिनेटरच्या लढतीपूर्वीचं सरावाचं सत्र रद्द केलं आहे. याशिवाय आरसीबीनं पत्रकार परिषद देखील सुरक्षेच्या मुद्यावरुन रद्द केली आहे. आरसीबीचा सराव मंगळवारी गुजरात कॉलेज ग्राऊंडवर होणार होता. मात्र, आरसीबीनं कोणतंही अधिकृत कारण न सांगता सराव सत्र रद्द केलं होतं. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सनं सराव सत्रात सहभाग घेतला. विराट कोहलीसह (Virat Kohli) इतर खेळाडूंच्या सुरक्षेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाल्यानं आरसीबीनं या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद देखील रद्द केली.
आयपीएलमध्ये क्वालिफायर-1 ची मॅच काल नरेंद्र मोदी स्टेडियमवर चालू असल्यानं दोन्ही संघांना सरावासाठी दुसऱ्या मैदानावर जावं लागणार होतं. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील मॅच काल सुरु होती. केकेआरनं ती मॅच जिंकली. गुजरात कॉलेजचं मैदान पर्याय म्हणून दोन्ही संघांना देण्यात आलं होतं.
गुजरात पोलिसांच्या अधिकाऱ्यांचा दाखला देत बंगाली भाषेतील दैनिक आनंदबझार पत्रिका या वृत्तपत्रानं आरसीबीनं सराव सत्र रद्द करण्याचा आणि दोन्ही संघांनी पत्रकार परिषद रद्द करण्याचा निर्णय घेण्यामागील कारण सुरक्षेचं कारण असल्याचा दावा करण्यात आला आहे. विराट कोहलीच्या सुरक्षेला धोका असल्याच्या कारणावरुन पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
आरसीबीकडून सरावसत्रासह पत्रकार परिषद रद्द
गुजरात पोलिसांनी अहमदाबादच्या विमानतळावर सोमवारी रात्री चार जणांना दहशतवादी कारवायांच्या संशयावरुन अटक करण्यात आली होती. पोलिसांना त्यांच्याकडून शस्त्र, काही व्हिडीओ आणि टेक्स्ट मेसेज मिळाले होते.
यासंदर्भातील माहिती दोन्ही संघांना देण्यात आली होती. राजस्थान रॉयल्सनं सराव सत्रात भाग घेतला. दुसरीकडे आरसीबीनं सराव सत्र आणि पत्रकार परिषद रद्द केली. हे करताना कोणतंही कारण अधिकृतपणे सांगण्यात आलं नव्हतं. राजस्थान आणि बंगळुरुचा संघ सोमवारीचं अहमदाबादमध्ये पोहोचला होता.
पोलीस अधिकारी विजयसिंघ ज्वाला यांनी विराट कोहलीला चार जणांच्या अटकेबाबत माहिती मिळाली होती. विराट कोहली राष्ट्रीय व्यक्तिमत्व असून त्याचं संरक्षण हे आमचं प्राधान्याचं काम आहे, असं म्हटलं. यानंतर आरसीबीकडून सरावसत्र रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. राजस्थानला देखील याबाबत माहिती देण्यात आली होतं, असं पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटलं.
आरसीबीच्या हॉटेलची सुरक्ष वाढवण्यात आली आहे. आरसीबीच्या खेळाडूंसाठी विशेष ठिकाणाहून प्रवेश दिला जाईल. आयपीएलच्या मान्यताप्राप्त पत्रकारांना देखील हॉटेलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. आरसीबीनं सराव सत्र आणि पत्रकार परिषद रद्द केली. तर, राजस्थान रॉयल्सनं केवळ पत्रकार परिषद रद्द केली.
संबंधित बातम्या :
विजय मल्ल्याचं विराट कोहलीबाबत ट्विट, राजस्थानविरुद्धच्या लढतीपूर्वी मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हटलं?
हरभजन सिंहने हार्दिक पांड्याची केली पाठराखण, म्हणाला, त्याची काहीच चूक नाही; रोहितला धरले जबाबदार