SRH vs KKR : मोठी बातमी, सनरायजर्सचा आयपीएल फायनलपूर्वी तडकाफडकी निर्णय, सराव सत्र रद्द, नेमकं कारण काय?
Sun Risers Hyderabad : पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वातील सनरायजर्स हैदराबादनं आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक दिलीय. फायनलमध्ये त्यांची लढत कोलकाता विरुद्ध होणार आहे.
चेन्नई : आयपीएलच्या 17 व्या पर्वातील (IPL 2024) अखेरचा सामना चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर पार पडणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) आमने सामने येणार आहेत. सनरायजर्स हैदराबादनं काल झालेल्या क्वालिफायर-2 च्या लढतीत राजस्थान रॉयल्सला 36 धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत आता कोलकाता आणि हैदराबाद एकमेकांसमोर उभे ठाकतील. कोलकाता नाईट रायडर्सनं क्वालिफायर -1 मध्ये हैदराबादला पराभूत केलं होतं. आयपीएल फायनलच्या पूर्वसंध्येला चेन्नईमधून मोठी बातमी समोर आली आहे. हैदराबादनं आज होणारं त्यांचं सरावाचं सत्र रद्द केलंय.
सनरायजर्स हैदराबादनं सराव सत्र रद्द का केलं?
सनरायजर्स हैदराबादनं सराव सत्र का केलं त्याचं कारण समोर आलं आहे. सनरायजर्स हैदराबादनं चेन्नईमध्ये वाढलेलं तापमान आणि आर्द्रता लक्षात घेता सरावाचं सत्र रद्द करत असल्याचं कारण दिलं आहे. चेन्नईतील वाढलेलं तापमान आणि आर्द्रतेचा फटका खेळाडूंना बसू नये आणि आयपीएलच्या फायनलमध्ये सर्व खेळाडू फिट असावेत या कारणामुळं हैदराबादनं हा निर्णय घेतला आहे.
सनरायजर्स हैदराबादनं प्लेऑफमध्ये प्रवेश केल्यानंतर क्वालिफायर-1 मध्ये कोलकाता विरुद्ध गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मॅच खेळली होती. त्यामध्ये मॅचमध्ये पराभव झाल्यानं त्यांना लगेचच क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नईमध्ये खेळावं लागलं. यामुळं खेळाडूंना विश्रांती मिळणं देखील महत्त्वाचं असल्यानं हैदराबादनं हा निर्णय घेतला.
कोलकाता नाईट रायडर्सचा वेगळा निर्णय
कोलकाता नाईट रायडर्सनं क्वालिफायर-1 मध्ये विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. केकेआरला क्वालिफायर-1 मॅचनंतर विश्रांती मिळालेली आहे. तर, लीग स्टेजमध्ये केकेआरची गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्धची मॅच रद्द करावी लागली होती. त्यामुळं कोलकाताच्या खेळाडूंना सराव करणं आवश्यक होतं. केकेआरनं चेन्नईत शुक्रवारी सायंकाळी 6 ते 9 या वेळात सराव केला. आज देखील केकेआर सराव करण्याची शक्यता आहे.
केकेआर की हैदराबाद विजेतेपद कुणाला मिळणार?
कोलकाता नाईट रायडर्सनं यंदा दमदार कामगिरीच्या जोरावर आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला होता. क्वालिफायर-1 मध्ये केकेआरनं 14 व्या ओव्हरमध्येच विजय मिळवला होता. आता अंतिम फेरीच्या लढतीत सनरायजर्स हैदराबादला पराभूत करण्याचा केकेआरचा प्रयत्न असेल. तर, हैदरबादचा देखील केकेआरला पराभूत करत दुसरं विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न असेल. उद्या होणाऱ्या अंतिम फेरीच्या लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.
संबंधित बातम्या :