(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : अभिषेक शर्माचे वादळ अन् कालसनचा झंझावात, हैदराबादची 197 धावांपर्यंत मजल
SRH vs DC, IPL 2023 : दिल्लीला विजयासाठी 198 धावांचे आव्हान आहे.
SRH vs DC, IPL 2023 : अभिषेक शर्मा याचे वादळ आणि कालसन याच्या झंझावाताच्या बळावर हैदाराबादने निर्धारित 20 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 197 धावांपर्यंत मजल मारली. अभिषेक शर्मा आणि हेनरिक कालसन यांनी वादळी खेळी केली. दिल्लीकडून मिचेल मार्श याने चार विकेट घेतल्या. दिल्लीला विजयासाठी 198 धावांचे आव्हान आहे.
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक -
सलामी फलंदाज अभिषेक शर्मा याने वादळी अर्धशतक झळकावले. अभिषेक शर्मा याने हैदराबादच्या डावाला आकार दिला. एका बाजूला विकेट पडत असताना अभिषेक शर्मा याने हैदराबादची धावसंख्या वाढवली. अभिषेक शर्मा याने 36 चेंडूत 67 धावांची खेळी केली. या खेळीत अभिषेक शर्मा याने 12 चौकार आणि एक षटकार लगावला. अभिषेक शर्माने मयंकासोबत 21, त्रिपाठीसोबत 23, एडन मार्करमसोबत 39 आणि कालसनसोबत 26 धावांची भागिदारी केली.
कालसनचा फिनिशिंग टच -
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर हेनरिक कालसन याने सर्व सुत्रे हातात घेतली. कालसन याने धावांचा पाऊस पाडला. कालसन याने अब्दुल समदसोबत 33 चेंडूत 53 धावांची भागिदारी केली. हैदराबादकडूनची ही सर्वात मोठी भागिदारी होय. अब्दुल समद बाद झाल्यानंतर अकिल हुसेन याच्या साथीने हैदराबादच्या डावाला फिनिशिंग टच दिला. हेनरिक कालसन याने अर्धशतकी खेळी केली. कालसन याने 27 चेंडूत नाबाद 53 धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीत कालसन याने चार षटकार आणि दोन चौकार लगावले. अब्दुल समद याने 21 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार लगावले. अकिल हुसेन याने 10 चेंडूत नाबाद 16 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार लगावला.
कर्णधारासह दिग्गज फ्लॉप -
हैदराबादच्या दिग्गज फंलदाजांनी नांगी टाकली. मयंक अग्रवाल पुन्हा एकदा अपयशी ठरला. मयंक अग्रवाल याला फक्त पाच धावा काढता आल्या. तर राहुल त्रिपाठी फक्त दहा धावा काढून तंबूत परतला. कर्णधान एडन मार्करम यालाही मोठी खेळी करता आली नाही. एडन मार्करम याला फक्त आठ धावा करता आल्या. यासाठी मार्करम याने 13 चेंडू घेतले. हॅरी ब्रूक याला खातेही उघडता आले नाही. ब्रूक याला मार्श याने तंबूत धाडले.
मिचेल मार्श याचा भेदक मारा -
दिल्लीकडून मिचेल मार्श याने भेदक मारा केला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत मिचेल मार्श याने हैदराबादच्या फंलदाजांना तंबूत धाडले. मिचेल मार्श याने चार षटकात 27 धावा खर्च करत चार विकेट घेतल्या. मिचेल मार्श याने एक षटक निर्धाव टाकले. अक्षर पटेल याने 4 षटकात 29 धावा देत एक विकेट घेतली. ईशांत शर्मालाही एक विकेट मिळाली. नॉर्खिया, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांची विकेटची पारी कोरीच राहिली.