(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanju Samson : अम्पायरसोबत वाद घालणं भोवलं, संजू सॅमसनला डबल धक्का, बीसीसीआयची मोठी कारवाई
Sanju Samson : राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन यानं दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये पंचांसोबत वाद घातला होता.
नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals ) विरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) याला आणखी एक धक्का बसला आहे. बीसीसीआयनं संजू सॅमसनवर मोठी कारवाई केली आहे. आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन करुन पंचांसोबत वाद घातल्या प्रकरणी बीसीसीआयनं दंड ठोठावला आहे. संजू सॅमसनला मॅच फीच्या 30 टक्के रक्कम दंड म्हणून बीसीसीआयकडे द्यावी लागणार आहे.
राजस्थान रायल्सची बॅटिंग सुरु असताना संजू सॅमसननं दिल्लीचा वेगवान बॉलर मुकेश कुमारच्या ओव्हरमध्ये लाँग ऑनच्या दिशेनं शॉट मारला होता. बाऊंड्रीवर असलेल्या शाई होपनं कॅच पकडला होता. होपनं बाऊंड्रीला स्पर्श केल्यासारखं दिसत असल्यानं संजू सॅमसनला थर्ड अम्पायरनं बाद दिलं
अम्पायरनं निर्णय दिल्यानंतर देखील संजू सॅमसन मैदानाबाहेर जाण्यास तयार नव्हता. संजूनं बराच वेळ अम्पायर सोबत वाद घातला. संजूला डीआएरस देखील घ्यायचा होता मात्र, मैदानावरील पंचांनी हा निर्णय थर्ड अम्पायरनं दिल्याचं सांगत डीआरएसला नकार दिला होता.
हा वाद मैदानावर संपला नाही. संजू सॅमसनच्या विकेटनंतर वादाला सुरुवात झाली. राजस्थान रॉयल्सचा डायरेक्टर ऑफ क्रिकेटर कुमार संगकारा देखील संतापलेला दिसला. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा मालक पार्थ जिंदाल जल्लोष करताना दिसून आला.
संजू सॅमसननं आयपीएलचा नियम अनुसूची 2.8 नुसार लेवल 1 ची चूक केल्याचं स्पष्ट झालं. संजू सॅमसननं देखील ती चूक मान्य केली. यानंतर मॅच रेफरी यांनी यावर निर्णय घेतला. लेवल 1 ची चूक असल्यास मॅच रेफरीचा निर्णय अंतिम असतो. याप्रकरणी संजू सॅमसनला मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
राजस्थानला पराभवाचा धक्का
दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सला पराभवाचा धक्का दिला आहे. दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 8 विकेटवर 221 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 8 बाद 201 धावा करु शकला. संजू सॅमसननं 46 बॉलमध्ये केलेली 86 धावांची खेळी वाया गेली.
दिल्ली कॅपिटल्सची गुणतालिकेत मोठी झेप
दिल्ली कॅपिटल्सनं गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील दिल्ली कॅपिटल्सनं विजय मिळवल्यानं त्यांच्या प्ले ऑफच्या आशा जिवंत राहिलेल्या आहेत. दिल्लीला पुढील दोन मॅच मोठ्या फरकनं जिंकाव्या लागतील.
संबंधित बातम्या :