(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RR vs MI : जोस बटलरने मुंबईला पुन्हा धुतले, राजस्थानची 158 धावांपर्यंत मजल
RR vs MI, IPL 2022 Marathi News : मुंबईचा संघ रॉयल विजय मिळवत कर्णधार रोहित शर्माला वाढदिवसाची विजयी भेट देणार का?
RR vs MI, IPL 2022 Marathi News : जोस बटलरच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या. मुंबईला विजयासाठी 159 धावांचे आव्हान असेल. मुंबईचा संघ हा सामना जिंकून कर्णधार रोहित शर्माला वाढदिवसाची विजयी भेट देणार का?
राजस्थान रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. देवदत्त पडिक्कल (15) याला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यास अपयश आले. पडिक्कलनंतर कर्णधार संजू सॅमसनही माघारी परतला. संजू सॅमसनला फक्त 16 धावा करता आल्या. मुंबईकडून पदार्पण करणाऱ्य कार्तिकेय सिंह याने संजू सॅमसनचा अडथळा दूर केला. डॅरेल मिचेलला प्रभावी कामगिरी करता आली नाही. मिचेल 17 धावांवर सॅम्सचा शिकार झाला. मागील सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या रियान पराग तीन धावा काढून तंबूत परतला. रियानला रायली मेरिडेथने बाद कले. रविचंद्र अश्विन याने 9 चेंडूत 21 धावा करत राजस्थानची धावसंख्या वाढवली. अश्विन याने छोटेखानी खेळीदरम्यान एक षटकार आणि तीन चौकार लगावले. हेटमायरला फिनिशिंग टच देण्यात अपयश आले. हेटमायरने मोक्याच्या क्षणी 14 चेंडूत फक्त सहा धावांची खेळी केली.
बुमराहची पाटी कोरीच -
पदार्पण कऱणाऱ्या कुमार कार्तिकेयला एक विकेट मिळाली. त्याशिवाय डॅनिअल सॅम्सलाही एक विकेट मिळाली. हर्तिक शौकीनची गोलंदाजी महागडी ठरली. शौकीन याने चार षटकात 47 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. रायले मेरिडेथ याला दोन विकेट मिळाल्या. जसप्रीत बुमराहाची पाटी कोरीच राहिली. बुमराहाला एकही विकेट मिळाली नाही. जसप्रीत बुमराहने चार षटकात 27 धावा खर्च केल्या.
मुंबईविरोधात बटलर पुन्हा चमकला -
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मुंबईविरोधात झालेल्या सामन्यात जोस बटलर याने शतकी खेळी केली होती. आजही बटलरने मुंबईची गोलंदाजी फोडून काढली. जोस बटलर याने सुरुवातीला सावध पवित्रा घेतला. जम बसल्यानंतर बटलरने धावांचा पाऊस पाडला. बटलरने 52 चेंडूत 67 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने चार षटकार आणि पाच चौकारांचा पाऊस पाडला.
नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने -
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने 35 व्या वाढदिवसाला नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला .
मुंबईच्या संघात दोन बदल -
मुंबईने राजस्थानविरोधात संघात दोन बदल केले. मुंबईने डेवॉल्ड ब्रेविस आणि जयदेव उनादकट यांना वगळले. कुमार कार्तिकेय सिंह (Kumar Kartikeya Singh) आणि टीम डेविड यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले. राजस्थान रॉयल्सने प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ राजस्थानने कायम ठेवला.
मुंबईची प्लेईंग 11 -
ईशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), टीम डेविड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हर्तिक शौकीन, कायरन पोलार्ड, डॅनिअल सॅम्स, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रायली मेरिडेथ
राजस्थानची प्लेईंग 11 -
जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार), डी. मिचेल, शिमरोन हेटायर, रियान पराग, रविचंद्रन अस्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, यजुवेंद्र चाहल, कुलदीप सेन