RR vs KKR: राजस्थान- कोलकाता सामन्यात विक्रमांचा पाऊस पडणार? संजू सॅमसन, सुनील नारायणसह 'हे' खेळाडू रचणार इतिहास
RR vs KKR: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 30व्या सामन्यात राजस्थान रॉयल चॅलेंजर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स एकमेकांशी भिडणार आहे.
RR vs KKR: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 30व्या सामन्यात राजस्थान रॉयल चॅलेंजर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स एकमेकांशी भिडणार आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्डेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विक्रमांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर तर, कोलकात्याचा नितीश राणा आणि सुनील नारायण नव्या विक्रमाला गवसणी घालू शकतात.
यावर्षीच्या हंगामात राजस्थानच्या संघानं चांगलं प्रदर्शन करून दाखवलं आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या संघानं पाच पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, कोलकाताच्या संघानं आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. यातील तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. यामुळं आजच्या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघ दोन गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहे.
संजू सॅमसन-
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं टी-20 क्रिकेटमध्ये 4951 धावा केल्या आहेत. यामुळं टी-20 क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ 49 धावांची आवश्यकता आहे. याशिवाय संजू सॅमसननं आयपीएलमध्ये एकूण 142 षटकार मारले आहेत. 150 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला 8 षटकारांची गरज आहे.
सुनील नारायण-
कोलकाताचा अष्टपैलू खेळाडू सुनील नारायण आयपीएलमधील 150 वा विकेट्स घेण्यापासून तीन विकेट्स दूर आहेत. तसेच त्याला आयपीएलमधील 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 24 धावांची गरज आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यात त्यानं 24 धावा केल्यास तो रवींद्र जाडेजा आणि ड्वेन ब्राव्होनंतर आयपीएलमध्ये 1000 धावा करणारा आणि 100 विकेट्स घेणारा तिसरा खेळाडू ठरेल.
नितीश राणा
आयपीएलमध्ये 100 षटकारांचा आकडा गाठण्यासाठी कोलकाताचा फलंदाज नितीश राणाला तीन षटकारांची गरज आहे. राजस्थानविरुद्ध आजच्या सामन्यात त्यानं तीन षटकार मारले तर, तो 100 षटकार मारणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरेल. याआधी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि लखनौचा कर्णधार केएल राहुलनं अशी कामगिरी केली आहे.
शिमरॉन हेटमायर
शिमरॉन हेटमायरनं आयपीएलमध्ये 46 षटकार मारले आहेत. आजच्या सामन्यात तो आणखी चार षटकार मारल्यास आयपीएलमध्ये 50 षटकार मारलेल्या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवेल. याशिवाय आयपीएलमध्ये 50 चौकार मारण्यापासून तो चार चौकार दूर आहे.
हे देखील वाचा-
- GT Vs CSK: राशीद खान- डेव्हिड मिलरची वादळी खेळी, चेन्नईच्या तोंडातून विजयी घास हिसकावला, गुजरातचा 3 विकेट्सनं विजय
- PBKS vs SRH, IPL 2022: हैदराबादविरुद्ध सामन्यात शिखर धवन पंजाबचा कर्णधार; मयांक अग्रवाल संघाबाहेर, नेमकं कारण काय?
- Shane Watson on Mumbai Indians: ईशान किशनवर 15 कोटी खर्च करणं मुंबईची सर्वात मोठी चूक- शेन वॉटसन