RCB VS RR IPL 2025 : चिन्नास्वामी स्टेडियमवर अखेर बंगळुरूचा विजय, पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्सला टाकले मागे! राजस्थानच्या आशा मिळाल्या धुळीस
अखेर आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची घरच्या मैदानावर पराभवाची मालिका संपली.

Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals IPL 2025 : अखेर आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची घरच्या मैदानावर पराभवाची मालिका संपली. या मैदानावर गेल्या सलग 3 सामन्यात पराभव पत्करणाऱ्या रजत पाटीदारच्या संघाने एका रोमांचक सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि राजस्थान रॉयल्सचा 11 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्या दमदार अर्धशतकांच्या मदतीने 205 धावा केल्या. यानंतर, यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल यांच्या दमदार खेळींमुळे राजस्थानला विजयाची आशा निर्माण केल्या. पण जोश हेझलवूडच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे सामना फिरला आणि बंगळुरूला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
चिन्नास्वामीवर किंग कोहली आणि देवदत्त पडिक्कलचा 'हिट'शो!
नाणेफेक हरल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रथम फलंदाजी करण्यासाठी आली, आणि त्यांची सुरुवात चांगलीच तुफानी झाली. फिल साल्ट-विराट कोहली या जोडीने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना धु-धु धूतले आणि पाचव्या षटकातच 50 धावांचा टप्पा पार केला. राजस्थानला पॉवरप्लेमध्ये कोणतेही यश मिळाले नाही, पण सातव्या षटकात बंगळुरूला पहिला धक्का सॉल्टच्या रूपात 61 धावांवर बसला. सॉल्टने 23 चेंडूत चार चौकारांसह 26 धावांची खेळी केली.
Elegance Personified 👌
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2025
Devdutt Padikkal's dream run continues with a stylish fifty 👏
🔽 Watch | #TATAIPL | #RCBvRR | @devdpd07
फिल साल्ट आऊट झाल्यानंतर विराट कोहलीने सुत्र हातात घेतले. या हंगामात, विराटने घरच्या मैदानावर एकही अर्धशतक झळकावले नव्हते, पण आज त्याने हा दुष्काळ संपवला आणि चालू हंगामातील त्याचे पाचवे अर्धशतक 32 चेंडूत पूर्ण केले. विराट 42 चेंडूत 70 धावा काढल्यानंतर 16 व्या षटकात 156 धावांवर आऊट झाला. कोहलीच्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. विराट कोहलीनंतर काही वेळातच देवदत्त पडिक्कलही आऊट झाला, पण त्याआधी त्याने दुसऱ्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली आणि आपले अर्धशतकही पूर्ण केले.
Another Day, Another Masterclass 👏
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2025
Virat Kohli lights up Chinnaswamy with 70 (42) 👌
🔽 Watch | #TATAIPL | #RCBvRR | @imVkohli
देवदत्त पडिक्कलच्या बॅटने 27 चेंडूत 50 धावा केल्या. टिम डेव्हिडने 15 चेंडूत 23 धावा केल्या. तर जितेश शर्माने 10 चेंडूत 20 धावा करून नाबाद राहिला. कर्णधार रजत पाटीदारच्या बॅटमधून फक्त 1 धाव आली. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजी कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, संदीप शर्माने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आर्चर आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
जैस्वालकडून धमाकेदार सुरुवात
प्रत्युत्तर, यशस्वी जैस्वालने डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून राजस्थानकडून स्फोटक सुरुवात केली. जैस्वालने वैभव सूर्यवंशीसोबत मिळून फक्त पाचव्या षटकात संघाला 50 धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्यानंतर नितीश राणानेही आक्रमक फलंदाजी सुरू केली. राजस्थानने पॉवरप्लेमध्येच 72 धावा केल्या होत्या आणि त्याच षटकात जोश हेझलवूडने जैस्वालची विकेट घेतली. पण नितीश आणि कर्णधार रियान पराग यांनीही आक्रमक फलंदाजी केली आणि 9 व्या षटकापर्यंत संघाला 110 धावांपर्यंत पोहोचवले.
कृणाल आणि हेझलवूडचा कहर
येथे कृणाल पांड्याने 10 व्या षटकात रियान परागची विकेट घेतली आणि त्यानंतर थोडा ब्रेक लावला. त्याच्या तिसऱ्या षटकात कृणालने नितीशलाही आऊट केले. यानंतर, जबाबदारी ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायरवर आली, जे गेल्या 2 सामन्यांमध्ये पराभवाचे खलनायक ठरले. दोघांमधील भागीदारी वाढत असल्याचे दिसत होते पण 17व्या षटकात हेझलवूडने हेटमायरला परत पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर 18 व्या षटकात जुरेलने भुवनेश्वर कुमारच्या षटकात 22 धावा काढून संघाला पुनरागमन मिळवून दिले. पण सामन्याचे भवितव्य 19 व्या षटकात ठरले. जेथे हेझलवूडने आधी जुरेल आणि नंतर जोफ्रा आर्चरला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले आणि फक्त 1 धाव दिली. 20 व्या षटकात आवश्यक असलेल्या 17 धावा राजस्थानच्या आवाक्याबाहेर राहिल्या आणि यश दयालने राजस्थानला 194 धावांवर रोखून संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
चिन्नास्वामी स्टेडियमवर अखेर बंगळुरूचा विजय
आरसीबीने त्यांच्या घरच्या मैदानावर हंगामातील पहिला विजय मिळवला आहे. याआधी त्यांनी चिन्नास्वामीविरुद्ध तीन सामने हरले होते. नऊ पैकी सहा सामने जिंकून बंगळुरू 12 गुणांसह आणि 0.482 च्या नेट रन रेटसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्सला मागे टाकले. मुंबई आता चार नंबरवर घसरली. त्याच वेळी, सलग पाच सामने गमावल्यानंतर राजस्थान आठव्या स्थानावर आहे. त्याचा नेट रन रेट -0.625 झाला आहे. त्यामुळे राजस्थानच्या आशा धुळीस मिळाल्या आहे.





















