Rohit Sharma : रोहित शर्माला जिकडे सन्माम मिळेल तिकडे जाईल, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य
Rohit Sharma : रोहित शर्मा सध्या मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात खेळत आहे. रोहित शर्माबाबत माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूनं मोठं वक्तव्य केलं आहे.
नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) संघाचं नेतृत्त्व रोहित शर्मा (Rohit Sharma ) ऐवजी हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) दिलं आहे. मुंबई इंडियन्सनं घेतलेल्या या निर्णयावर मुंबईचे चाहते,माजी क्रिकेटपटूंनी भाष्य केलं आहे. रोहित शर्मानं मुंबईला पाचवेळा विजेतेपद मिळवून दिलं होतं. मात्र, त्याला ज्या प्रकारे कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं त्यावरुन चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मुंबई इंडियन्सच्या अहमदाबाद, हैदराबाद आणि मुंबईतील मॅच पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी हार्दिक पांड्यावर शेरेबाजी केली होती. या माध्यमातून चाहत्यांनी रोहित शर्माला कर्णधार पदावरुन हटवण्याच्या निर्णयाविरुद्ध संताप व्यक्त केला होता. रोहित शर्मा पुढील आयपीएलमध्ये दुसऱ्या संघाकडून खेळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूनं (Ambati Rayudu) मोठं वक्तव्य केलं आहे. विशेष बाब म्हणजे अंबाती रायुडूनं काही वर्ष मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जाएंटस यांनी रोहित शर्मा त्यांच्या टीममध्ये आल्यास फायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. टीम इंडियाचा आणि चेन्नई सुपर किंग्ज माजी क्रिकेटपटू असलेल्या अंबाती रायुडूनं या वादात उडी घेतली आहे. मुंबईकडून रोहित शर्माला योग्य सन्मान दिला जात नाही, असं अंबाती रायुडूनं म्हटलं.
अंबाती रायुडूनं या संदर्भात बोलताना म्हटलं की,"तो रोहित शर्माचा निर्णय असेल, त्याला जिकडे जायचं असेल तो जाऊ शकतो. आयपीएलमधील सर्व संघाला तो कॅप्टन असावा, असं वाटतं." अंबाती रायुडू पुढं म्हणाला की, मला विश्वास आहे, ज्या फ्रँचायजीमध्ये त्याला आता जी वागणूक मिळतेय त्यापेक्षा जिकडे चांगला सन्मान मिळेल तिकडे तो जाईल. रायुडू स्टार स्पोर्टसच्या कार्यक्रमात बोलत होता.
रोहित शर्मानं आयपीएलमध्ये पाचवेळा मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून दिलं आहे. 2013,2015,2017,2019,2020 च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून दिलं आहे. आयपीएलच्या 17 वव्या हंगामात मुंबई इंडियन्सला पहिल्या तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईला पहिल्या तीन मॅचमध्ये गुजरात टायटन्स, सनराजयजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सनं पराभूत केलं होतं. मुंबई इंडियन्सनं वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत पहिला विजय मिळवला.
मुंबई आणि आरसीबी उद्या आमने सामने येणार
मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत चार पैकी एका मॅचमध्ये विजय मिळवला आहे. उद्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने येणार आहेत. मुंबई इंडियन्स उद्या देखील विजय मिळवणार का हे पाहावं लागेल. दुसरीकडे आरसीबी देखील विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरु शकते.
संबंधित बातम्या :
Rohit Sharma : मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माचा तो व्हिडीओ शेअर केला अन् अफवांचं पेव फुटलं, काय घडलं?