(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WPL 2023: आता नो आणि वाइड बॉलवरही रिव्ह्यू घेता येणार; यावर्षीपासूनच नवा नियम लागू
WPL 2023: आता नो आणि वाइड बॉलवरही रिव्ह्यू घेता येणार आहे. मुंबई आणि गुजरात यांच्यात खेळवल्या गेलेल्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरनं सर्वात आधी याचा वापर केला.
WPL 2023: महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) पहिला हंगाम मुंबईत खेळवला जात आहे. पहिल्या दोन दिवसांत तीन सामने झाले आणि तिन्ही सामने उत्कृष्ट झाले आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात जायंट्स (Gujarat Giants) यांच्यात खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात धावसंख्या 200 पार गेली, तर दुसऱ्या दिवशी दिल्ली आणि बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यातही धावसंख्या 200 पार गेली होती. विशेष म्हणजे, दोन्ही सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, मिताली राजच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या गुजरात संघाला दोन सामने गमवावे लागले आहेत. अशातच या स्पर्धेत आता एका नव्या नियमाची सुरुवात झाली आहे.
WPL पासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये नवा नियम सुरू झाला आहे. नियम असा आहे की, आता खेळाडूंना नो बॉल आणि वाइड बॉलवरही रिव्ह्यू घेता येणार आहे. म्हणजेच, आतापासून अंपायरच्या कोणत्याही निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकते. नवा नियम वापरण्यास खेळाडूंनी सुरुवातही केली आहे. मुंबई आणि गुजरात यांच्यात खेळवल्या गेलेल्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरनं सर्वात आधी त्याचा वापर केला. पहिल्याच सामन्यात त्यानं पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं.
आयपीएल 2023 मध्ये 'हा' नियम होणार लागू
डब्ल्यूपीएलनंतर आयपीएलच्या आगामी सीझनमध्ये हा नियम लागू केला जाणार आहे. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, "आयपीएल 2023 पासून, डीआरएस प्रणालीमध्ये आणखी एक नियम समाविष्ट केला जाईल. ज्यामध्ये खेळाडू वाइड आणि नो बॉलला चॅलेंज करून रिव्ह्यू घेऊ शकतील. हे सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर, जर एखादा चेंडू फलंदाजाच्या जवळून गेला, परंतु अंपायरला वाटलं की, चेंडू बॅटरच्या शरीराच्या किंवा बॅटच्या अगदी जवळून गेलीये आणि त्यानं तो चेंडू वाइड दिला नाही, तर मात्र अंपायरच्या या निर्णयाला बॅटर चॅलेंज करुन रिव्ह्यू घेऊ शकतो. जर रिव्ह्यू बरोबर असेल, तर रिव्ह्यू शिल्लक राहिल. हाच नियम गोलंदाज संघाला लागू होईल. जर त्यांना वाटलं की, अंपायरने वाइड नसलेल्या चेंडूला वाइट दिला, तर गोलंदाजही रिव्ह्यू घेऊ शकतात.
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळाडूंनी या नवीन नियमाचा वापर केला आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात, मुंबईची फिरकीपटू सायका इशाकचा चेंडू मैदानी पंचांनी लेग साइडच्या बाजूनं वाइड डाउन ठरवला. मुंबईनं डीआरएसचा वापर करून निर्णयाचा रिव्ह्यू केला आणि चेंडू बॅट्समन मोनिका पटेलच्या हातमोजेला लागल्याचं रिप्लेमध्ये दिसून आलं.