IPL 2022 : तीन वेळा अनसोल्ड, 22 व्या वर्षी पदार्पणाची संधी, पहिल्याच सामन्यात वादळी अर्धशतक, कोण आहे आयुष बडोनी?
IPL 2022, LSG vs GT : गुजरात संघाने लखनौचा पराभव करत आयपीएलची सुरुवात दणक्यात केली. सोमवारी लखनौच्या पराभवापेक्षा 22 वर्षीय आयुष बडोनी या खेळाडूची चर्चा अधिक झाली.
IPL 2022, LSG vs GT : गुजरात संघाने लखनौचा पराभव करत आयपीएलची सुरुवात दणक्यात केली. सोमवारी लखनौच्या पराभवापेक्षा 22 वर्षीय आयुष बडोनी या खेळाडूची चर्चा अधिक झाली. आयुष बडोनी याने पदार्पणाच्या सामन्यात तुफानी खेळी केली. दबावाद आयुष बडोनी याने 41 चेंडूत 54 धावांचे योगदान दिले. बडोनीच्या अर्धशतकी खेळीड्या बळावर लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करताना सन्मानजनक धावसंख्यापर्यंत मजल मारली होती. या सामन्यात गुजरातने बाजी मारली, मात्र चर्चा आयुष बडोनी याचीच झाली. सामन्यानंतर समालोचक हर्षा भोगले यांनीही बडोनी याचे कौतुक केले. हर्षा भोगले यांनी बडोनीला तू कुठे लपून बसला होता? असा मिश्किल सवाल केला.
हर्षा भोगलेचा हा प्रश्न बरोबर असल्याचे वाटतेय. कारण आयुष बडोनीने आतापर्यंत फर्स्ट क्लास अथवा लिस्ट ए क्रिकेट खेळलेले नाही. आयुष बडोनीकडे दोन राज्यात झालेल्या पाच टी 20 सामन्याचा अनुभव आहे. या पाच सामन्यात बडोनीला फक्त एकदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. यामध्ये त्याने फक्त आठ धावा केल्या. अशातच अचानक आयुष बडोनीने आयपीएलमध्ये दणक्यात पदार्पण केले. त्याची ही कामगिरी सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारी आहे.
22 वर्षीय आयुष बडोनी दिल्लीसाठी क्रिकेट खेळतो. आतापर्यंत बडोनीला 'लिस्ट A' आणि 'फर्स्ट क्लास' क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. बडोनीला एकदा भारतीय अंडर 19 संघात श्रीलंकाविरोधात स्थान मिळाले होते. श्रीलंकाविरोधात यूथ टेस्ट सामन्यात बडोनीने नाबाद 185 धावांची खेळी केली होती. 2018 मध्ये झालेल्या अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात आयुष बडोनीने 28 चेंडूत 52 धावांची विस्फोटक फलंदाजी केली होती. 2018 मध्ये झालेल्या आशिया चषकात आयुष बडोनीने 83 च्या सरासरीने 186 धावा चोपल्या होत्या. फलंदाजीसोबत बडोनी फिरकी गोलंदाजीही करु शकतो.
आयुषने याआधी तीन वेळा आयपीएलच्या लिलावात उतरला होता. मात्र, त्याला कुणीही खरेदी केले नव्हते. 2022 मध्ये लखनौने त्याच्यावर डाव खेळला. लखनौचा हा डाव आतापर्यंत तर यशस्वी झाल्याचे दिसतेय. लखनौने आयुषला 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे. आयुष बडोनी याने दोन्ही सराव सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळेच पहिल्या सामन्यात आयुषला संधी देण्यात आली. संघ व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वास आयुषने सार्थ ठरवलाय.