IPL 2026 : मुंबई इंडियन्स ते चेन्नई सुपर किंग्ज 8 संघांचे कर्णधार निश्चित, 2 टीमचा निर्णय गुलदस्त्यात, कोणाला संधी मिळणार?
IPL 2026: आयपीएलच्या 2026 च्या हंगामात बहुतांश संघ जुन्या कॅप्टनच्या नेतृत्त्वात खेळणार आहेत. तर, राजस्थान कर्णधार म्हणून कोणाला संधी देणार हे पाहावं लागेल.

नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील हंगामासाठी सर्व संघांकडून रिटेन्शन लिस्ट जारी केली आहे. यानंतर सर्व संघांचे निम्म्याहून अधिक खेळाडू निश्चित झाले आहेत. आता आयपीएलसाठी मिनी ऑक्शन 16 डिसेंबरला होणार आहे. त्यापूर्वी 10 पैकी 8 संघांनी कॅप्टन निश्चित केले आहेत.
IPL 2026 : 8 संघांचे कॅप्टन ठरले
रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुचा कॅप्टन रजत पाटीदार आहे. तो गेल्या वर्षीच्या हंगामात आरसीबीचा पहिल्यांदा कॅप्टन झाला. रजत पाटीदारनं गेल्या 17 हंगामात जे घडलं नव्हतं ते घडवत 18 व्या हंगामाचं विजेतेपद टीमला मिळवून दिलं. त्यामुळं रजत पाटीदार 2026 च्या हंगामात आरसीबीचा कॅप्टन असेल. आरसीबीनं रजत पाटीदारला गेल्या हंगामात 11 कोटींमध्ये रिटेन केलं होतं. 2026 च्या आयपीएलसाठी देखील त्याला रिटेन करण्यात आलं आहे. पाटीदारनं आयपीएलमध्ये 42 मॅचमध्ये 1111 धावा केल्यात. त्याच्या नावावर 1 शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.
चेन्नई सुपर किंग्जनं ट्रेड डील करत संजू सॅमसनला संघात घेतलं आहे. मात्र, टीमचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड असेल. ऋतुराज गायकवाड गेल्या हंगामात दुखापतीमुळं आयपीएल बाहेर गेला होता. त्यामुळं नेतृत्व धोनीकडे आलं होतं. ऋतुराज गायकवाडला चेन्नईनं गेल्या वर्षी 18 कोटी रुपयांना रिटेन केलं होतं.ऋतुराजनं आयपीएलमध्ये 71 मॅचमध्ये 2502 धावा केल्यात, ज्यात 2 शतक आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे.
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या असेल. पांड्यानं गुजरातला 2022 मध्ये विजेतेपद मिळवून दिलं आहे. त्यानं आयपीएलमध्ये 152 मॅच खेळल्या असून 2749 धावा केल्यात. यात 10 अर्धशतकांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सनं त्याला 16.35 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं.
केकेआरचा कॅप्टन गेल्या हंगामात अजिंक्य रहाणे होता. या हंगामासाठी त्याला केकेआरनं रिटेन केलं आहे. अधिकृत घोषणा झाली नसली तरी त्याच्या नावाची कॅप्टन म्हणून घोषणा होण्याची अधिक शक्यता आहे.
पंजाब किंग्जचा कॅप्टन श्रेयस अय्यर असून त्याला टीमनं 26.75 कोटींना ऑक्शनमध्ये खरेदी केलं. पंजाब किंग्जनं 18 व्या हंगामाच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. श्रेयस अय्यर आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जकडून खेळला आहे. त्यानं आयपीएलमध्ये 133 मॅचमध्ये 3731 धावा केल्यात. अय्यरनं एकूण 27 अर्धशतकं केली आहेत.
गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिल आहे. गिल सध्या भारताच्या कसोटी आणि वनडे संघाचा कॅप्टन आहे. गिलला गुजरातनं गेल्या वर्षी 16.5 कोटींना रिटेन केलं होतं. त्यानं आयपीएलमध्ये 118 मॅच खेळल्या आहेत. ज्यात त्यानं 3866 धावा केल्या असून 4 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे.
लखनौ सुपर जायंटसचा कॅप्टन रिषभ पंत आहे. यंदा देखील लखनौनं त्याला रिटेन केलंय. त्याला लखनौनं 27 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. तो यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. रिषभनं आयपीएलमध्ये 125 मॅचमध्ये 3553 धावा केल्या असून त्यात 2 शतक आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे.
सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स आहे. आयपीएलमधील तो एकमेव विदेशी कॅप्टन आहे. कमिन्सच्या नेतृत्त्वात हैदराबादनं 2024 मध्ये अंतिम फेरीत धडक दिली होती. त्याला टीमनं रिटेन केलं आहे. सनरायजर्स हैदराबादनं त्याला 18 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं. आयपीएलमध्ये त्यानं यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडून सहभाग घेतला आहे. ज्यात त्यानं 72 मॅचमध्ये 79 विकेट घेतलेत.
दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन अक्षर पटेल असेल. तो टीममधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्याला टीमनं गेल्या वर्षी 16.50 कोटींना रिटेन केलं होतं. यावेळी देखील त्याला रिटेन करण्यात आलं आहे. अक्षर पटेल 2014 पासून आयपीएल खेळतोय. सुरुवातीला तो पंजाब किंग्जकडे होता. पटेनलं आयपीएलमध्ये 162 मॅचेस खेळल्या असून त्यानं 1916 धावा केल्या असून 128 विकेट घेतल्या आहेत.तो दिल्लीकडून 2019 पासून खेळतोय.
आयपीएलच्या 2026 च्या हंगामात राजस्थान रॉयल्सला नव्या कॅप्टनची निवड करावी लागणार आहे. कारण, कॅप्टन संजू सॅमसन ट्रेड डीलद्वारे चेन्नई सुपर किंग्जमध्ये गेलाय. रवींद्र जडेजा ट्रेड डीलमधून राजस्थानमध्ये दाखल झाला आहे. आता राजस्थान जडेजाल कॅप्टन करणार की आणखी कोणाला हे स्पष्ट झालं नाही. त्याला राजस्थाननं 14 कोटींमध्ये ट्रेड केलंय.




















