IPL 2025 : बुमराह, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, के. एल. राहुलबाबत विजय मल्ल्याचं मोठं विधान; म्हणाला, जर हे चार खेळाडू...
IPL 2025 : माजी संघ मालक विजय मल्ल्याने राज शमनी यांच्यासोबतच्या पॉडकास्ट दरम्यान आरसीबीशी संबंधित जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने अखेर त्यांचे 18 वर्षांचे स्वप्न पूर्ण केले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव करून आरसीबी संघाने 18 वर्षांनंतर पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले. या ऐतिहासिक विजयानंतर, माजी संघ मालक विजय मल्ल्याने राज शमनी यांच्यासोबतच्या पॉडकास्ट दरम्यान आरसीबीशी संबंधित त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या आणि त्यांच्या काही अपूर्ण इच्छाही शेअर केल्या आहेत.
राज शमानी यांच्या पॉडकास्टवर संवादादरम्यान विजय मुल्ल्याला विचारण्यात आले की, जर RCB ला लिलावात कोणताही खेळाडू निवडता आला असता, तर ते कोणते खेळाडू आपल्या संघात घेण्यास पसंत करतात? या प्रश्नाच्या उत्तरात विजय मुल्ल्याने क्षणाचाही विलंब न करता चार भारतीय खेळाडूंची नावे घेतली, जे त्यांना त्यांच्या संघात पाहायचे आहेत. हे चार खेळाडू म्हणजे भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मिस्टर 360 सूर्यकुमार यादव, सध्या भारतीय संघाचा उपकर्णधार असलेला ऋषभ पंत आणि बेंगळुरू बॉय के. एल. राहुल.
जर हे चार खेळाडू संघात असते, तर ट्रॉफी RCB नेच जिंकली असती
मुल्ल्याने पुढे पॉडकास्टमध्ये बोलताना म्हटलं की, "जर माझे स्वप्नं सत्यात उतरू शकले असते, तर जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि केएल राहुल हे चार खेळाडू RCB च्या संघात असते. मग दुसऱ्या कोणत्याही खेळाडूची गरजच भासली नसती आणि आयपीएलची ट्रॉफी RCB च्याच नावावर झाली असती." दरम्यान, हे चारही खेळाडू सध्या भारतीय क्रिकेट संघाचे अत्यंत महत्त्वाचे खेळाडू मानले जातात. जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव हे तिघेही खेळाडू 2024 मध्ये भारताला T20 विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाचा भाग होते आणि येत्या काही वर्षांत हे तिघेही भारतीय संघाच्या कणा मानले जात आहेत. केएल राहुल याआधी RCB संघात सामावून घेण्यात आलं होतं, पण नंतर के. एल. राहुल RCB सोडून इतर संघांमध्ये खेळू लागला. तर ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे आजवर RCB संघासाठी कधीही खेळलेले नाही.
कोहलीला निवडणं ही अभिमानाची गोष्ट होती
जरी विजय मुल्ल्याला या चार खेळाडूंना (बुमराह, सूर्यकुमार, पंत आणि राहुल) कधीच त्यांच्या संघात घेण्याची संधी मिळाली नाही, तरी या पॉडकास्टमध्ये त्यांनी विराट कोहलीबद्दल आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या आहेत. जेव्हा 2008 मध्ये त्यांनी RCB ची सुरुवात केली, तेव्हा त्यांनी विराट कोहलीला एक युवा खेळाडू म्हणून संघात निवडलं होतं. आणि आज 18 वर्षांनंतर कोहलीच तो खेळाडू आहे ज्याने RCB ला आयपीएल चॅम्पियन बनवलं, असे विजय मुल्ल्याने म्हटले आहे.
दरम्यान, RCB ने आयपीएल विजेतेपद पटकावल्यानंतर विजय मल्ल्याने एक्सवर म्हटलं होतं की, “जेव्हा मी RCB संघ तयार केला होता, तेव्हा माझं स्वप्न होतं की आयपीएलची ट्रॉफी बंगळुरूला यावी. मला क्रिकेटमधील सर्वात महान खेळाडू विराट कोहलीला एक युवा म्हणून संघात घेण्याचा सन्मान मिळाला आणि ही मोठी गोष्ट आहे की त्याने सलग 18 वर्ष संघाबरोबर राहून फक्त RCB साठीच खेळ सुरू ठेवला.”
आणखी वाचा




















