(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सचा होम ग्राऊंडवर पराभव, सनरायजर्स हैदराबादची राजधानी मोहीम फत्ते
DC vs SRH : आयपीएलमधील 35 वी मॅच दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पार पडली. या मॅचमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पडला.
नवी दिल्ली : सनरायजर्स हैदराबादनं (Sun Risers Hyderabad) पहिल्यांदा फलंदाजी करतना 7 बाद 266 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघ 199 धावांवर बाद झाला. दिल्लीकडून जॅक फ्रेजर मॅक्गर्क, अभिषेक पोरेल आणि रिषभ पंत यांनी चांगली खेळी केली. मात्र, एका बाजूनं विकेट पडत गेल्या आणि दिल्लीचा होम ग्राऊंडवर पराभव झाला. दिल्ली कॅपिटल्सचा डाव 199 धावांवर आटोपला. सनरायजर्स हैदराबादच्या बॉलर्सनं दिल्लीला रोखण्यात यश मिळवल्यानं त्यांनी स्पर्धेतील पाचवा विजय मिळवला. सनरायजर्स हैदराबादनं दिल्लीला 67 धावांनी पराभूत केलं. आजच्या विजयासह हैदराबाद गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
दिल्लीचा डाव 199 धावांवर आटोपला
दिल्ली कॅपिटल्सनं 266 धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पृथ्वी शॉ 16 धावा करुन बाद झाला. यानंतर डेव्हिड वॉर्नर देखील चांगली कामगिरी करु शकला नाही. त्यानं केवळ 1 रन केली. यानंतर जॅक फ्रेजर मॅक्गर्क आणि अभिषेक पोरेलनं डाव सावरला. दिल्ली कॅपिटल्सनं सातव्या ओव्हरमध्येच 100 धावांचा टप्पा पार केला होता. मॅक्गर्कनं अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर दिल्लीच्या धावगतीला वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, 65 धावांवर तो बाद झाला. यानंतर अभिषेक पोरेल देखील 42 धावा करुन बाद झाला. यानंतर रिषभ पंतला दिल्लीच्या इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. रिषभ पंतनं 44 धावा केल्या.
सनरायजर्स हैदराबादच्या बॉलर्सनी दिल्लीला 199 धावांवर रोखलं. टी नटराजन यानं 4, वॉशिंग्टन सुंदर 1, भुवनेश्वर कुमार 1 मयंक मार्कंडे 2 आणि नितीश कुमार रेड्डी 2 विकेट घेतल्या.
सनरायजर्स हैदराबादनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 266 धावा केल्या होत्या. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं पॉवर प्लेमध्ये 125 धावा केल्या होत्या. हेड आणि शर्मानं चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर हैदराबादच्या संघानं धावसंख्या 266 धावांपर्यंत पोहोचवली. 32 बॉलमध्ये 89 धावा करणाऱ्या ट्रेविस हेडला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डनं गौरवण्यात आलं. ट्रेविस हेडनं 89 , अभिषेक शर्मानं 46 धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर नितीशकुमार रेड्डी आणि शाहबाझ अहमदनं हैदराबादचा डाव सावरला. नितीशकुमार रेड्डीनं 37 धावा केल्या तर शाहबाझ अहमदनं 59 धावा केल्या आणि हैदराबादला 266 धावांपर्यंत पोहोचवलं.
दिल्ली कॅपिटल्सचं होम ग्राऊंडवर विजय मिळवण्याचं स्वप्न भंगलं आहे. दिल्लीनं यापूर्वीच्या दोन मॅच जिंकल्या होत्या. आज मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2024, SRH vs DC: 6 ओवर्समध्ये 125 रन्स, हैदराबादने आयपीएलचा इतिहास, भूगोल सगळंच बदलून टाकलं!
IPL 2024 Travis Head : 16 बॉलमध्ये 50 धावा, पहिल्या 3 षटकात 61, हेडने पुन्हा धू धू धुतले
बातमी अपडेट होत आहे...