(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 , RCB vs KKR : कर्ण लढला पण आरसीबीचं नशीब फुटकं, रोमहर्षक लढतीत एक रननं केकेआरचा विजय
KKR vs RCB : कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर मॅच पार पडली. पहिल्यांदा बॅटिंग करताना केकेआरनं 222 धावा केल्या होत्या.
कोलकाता: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात आयपीएलमधील 36 वी लढत कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर पार पडली. कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 विकेटवर 222 धावा केल्या.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं 20 ओव्हरमध्ये 221 धावा केल्या. अखेरच्या बॉलवर तीन धावांची गरज असताना आरसीबीला केवळ एक रन काढता आली. गुणतालिकेत केकेआर पुन्हा दुसऱ्या स्थानावर पोहोचलं आहे.
कोलकातानं दिलेल्या 222 धावांचा पाठलाग करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात चांगली झाली नाही. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं डावाची सुरुवात केली. पहिल्या दोन ओव्हरमध्ये आरसीबीनं 27 धावा केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विराट कोहली बाद झाला. विराटच्या विकेटवरुन जोरदार वादंग पाहायला मिळाला. आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस देखील मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. आरसीबीचे दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर विल जॅक्स आणि रजत पाटीदारनं चांगली धावसंख्या केली. दोघांनी आरसीबीचा डाव सावरला. मात्र, दोघेही एकाच ओव्हरमध्ये बाद झाले. आंद्रे रसेलनं विल जॅक्स आणि रजत पाटीदारला एकाच ओव्हरमध्ये बाद केलं. विल जॅक्सनं 55 धावा केल्या तर रजत पाटीदारनं 52 धावा केल्या.
यानंतर आरसीबीकडून फलंदाजीला आलेले कॅमरुन ग्रीन आणि लोम्रोर मोठी धावसंख्या करु शकले नाहीत. प्रभुदेसाईनं 24 धावा करुन डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दिनेश कार्तिकनं 25 धावा करुन आरसीबीला विजयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कर्ण शर्मानं 7 बॉलमध्ये 20 धावा केल्या. त्यानं मिशेल स्टार्कला शेवटच्या ओव्हरमध्ये तीन सिक्स मारले.
केकेआरकडून फिल सॉल्ट, श्रेयस अय्यस, रिंकू सिंग, आंद्रे रसेल आणि रमनदीप सिंगनं चांगली फलंदाजी केली. केकेआरनं या फलदाजांच्या कामगिरीच्या जोरावर 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 222 धावा केल्या. फिल सॉल्टनं 3 सिक्स आणि 7 चौकारांसह 48 धावा केल्या. तर, कॅप्टन श्रेयस अय्यरनं 1 सिक्स आणि 7 चौकारांसह 50 धावा केल्या होत्या. कोलकाताचे इतर फलंदाज मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. कोलकाता नाईट रायडर्सनं होम ग्राऊंडवर 222 धावांचा डोंगर उभा केला होता. आरसीबीकडून मोहम्मद सिराजनं एक विकेट घेतली. यश दयाळनं दोन विकेट घेतल्या. लॉकी फर्गुयसननं 2 तर कॅमरुन ग्रीननं एक विकेट घेतली.
संबंधित बातम्या :
Video : जोरात बॅट झटकली, अम्पायरवर गेला धावून, आऊट दिल्यानं विराट खवळला; मैदानातच रागराग!