रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
कुंदन लाटे यांच्यासमवेत मध्यरात्री हल्ल्याच्या वेळी गाडीत जिल्हाध्यक्ष बालकृष्ण इंगळे हे देखील उपस्थित होते.

संभाजीनगर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले (RPI) गटाचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष कुंदन लाटे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जालना (jalna) येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीहून कुंदन लाटे परतत असताना, सिडको परिसरातील साउथ सिटी महानगर क्रमांक 2 च्या गेटवर त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला, असा आरोप करण्यात आला आहे. 6 नोव्हेंबरच्या मध्यरात्री, म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजून 43 मिनिटांनी ही घटना घडली.
कुंदन लाटे यांच्यासमवेत मध्यरात्री हल्ल्याच्या वेळी गाडीत जिल्हाध्यक्ष बालकृष्ण इंगळे हे देखील उपस्थित होते. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोघांचा जीव थोडक्यात बचावल्याचं सांगण्यात येत. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, हल्लेखोरांविरोधात तपास सुरू आहे. दरम्यान, या हल्ला प्रकरणातील एक व्हिडिओ समोर आला असून गाडीच्या समोर मध्यरात्रीच्या सुमारास दोन व्यक्ती दिसून येत आहेत. या व्यक्तींना पाहून गाडीतील व्यक्ती कार थांबवण्याबाबत बोलताना ऐकू येते. विशेष म्हणजे गाडीसमोर उभे असलेल्या व्यक्तींकडे बंदूक असल्याचंही व्हिडिओत ऐकू येत आहे.
हेही वाचा

























