Virat Kohli : नाम तो सुना होगा... विराट कोहली, स्टार्कला सिक्स मारला अन् आयपीएलच्या 17 वर्षात कुणालाही जमलं नाही ते विराटनं केलं
Virat Kohli : आयपीएलच्या यंदाच्या पर्वात जरी आरसीबीला विजय मिळवता आला नसला तरी विराट कोहलीनं चांगल्या धावा केल्या आहेत. विराटकडे सध्या ऑरेंज कॅप आहे.
कोलकाता : कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आयपीएलमधील 36 वी मॅच पार पडली. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यातील मॅचमध्ये शेवटच्या बॉलवर निकाल लागला. कोलकाता नाईट रायडर्सनं एका रननं मॅच जिंकली. आरसीबीचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीनं बाद झाल्यानंतर पंचांसोबत वाद घातला. यावरुन विराट कोहलीवर माजी क्रिकेटपटूंकडून टिकेची झोड उठवली जात आहे. विराट कोहलीनं बाद झाल्यानंतर डीआरएस घेतला होता. फुलटॉस असल्यानं तो बॉल नो दिला जाईल, असं विराट कोहलीला वाटलं होतं मात्र थर्ड अम्पायरनं तो बॉल योग्य ठरवला आणि विराटला बाद दिलं. या वादामुळं जरी विराट कोहली चर्चेत असला तरी त्यानं आणखी एक विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.
आयपीएलमध्ये कुणालाही जमलं नाही ते विराटनं केलं
विराट कोहलीनं आज 7 बॉलमध्ये दोन सिक्स आणि एक चौकार मारला. मिशेल स्टार्कला विराट कोहलीनं दोन सिक्स मारले. यातील दुसऱ्या सिक्ससह विराट कोहलीनं आणखी एका विक्रमावर नाव कोरलं. विराट कोहली आयपीएलमध्ये एखाद्या संघासाठी 250 सिक्स मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेलचा क्रमांक आहे. ख्रिस गेलनं आरसीबीसाठी 239 सिक्स मारले आहेत. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनं आरसीबीसाठी 238 सिक्स मारले आहेत. यांच्या नंतर चौथ्या क्रमांकावर रोहित शर्माचा नंबर आहे. रोहित शर्मानं मुंबई इंडियन्ससाठी 224 सिक्स मारले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्यांच्या यादीत ख्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे. ख्रिस गेलनं 357 सिक्स मारले आहेत. तर, रोहित शर्माच्या नावावर आयपीएलमध्ये 275 सिक्स आहेत. दुसरीकडे एबी डिव्हिलियर्सच्या नावावर 251 सिक्स आहेत. विराट कोहलीनं एकाच टीमकडून आयपीएलमध्ये खेळताना 250 सिक्स मारले आहेत. पुढील मॅचमध्ये विराट कोहली डिव्हिलियर्सला मागं टाकू शकतो.
आरसीबीचा सातवा पराभव
दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामात देखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयाचा सूर सापडलेला नाही. आरसीबीनं यंदाच्या आयीपएलमध्ये आठ पैकी केवळ एका मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर, सात सामन्यांमध्ये आरसीबीचा पराभव झाला आहे. फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारखे दिग्गज खेळाडू असून देखील आरसीबीला सूर सापडलेला नाही. आरसीबीसध्या गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. तर विराट कोहली मात्र सर्वाधिक धावसंख्येसह ऑरेंज कॅप विजेता आहे.
संबंधित बातम्या :