IPL 2024 Final: आयपीएलचा अंतिम सामना फिक्स होता?, नाण्याच्या दोन्ही बाजूला हेड...; Video पाहून सर्व चक्रावले!
IPL 2024 Final KKR vs SRH: कोलकाताच्या विजयाची चर्चा सुरु असताना एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
IPL 2024 Final KKR vs SRH: कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर तिसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर कब्जा केला आहे. चेन्नईतील एमए. चिदंबरम मैदानावर झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH) सामन्यात कोलकाताने बाजी मारली. कोलकाताने हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव करत तिसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं. (KKR ARE CHAMPIONS OF IPL 2024)
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2024 च्या हंगामात खूप चांगली कामगिरी केली. हैदराबादने यंदाच्या हंगामात अनेक विक्रमांची नोंद केली. मात्र कोलकातासमोर हैदराबादला सांघिक कामगिरी करण्यात अपयश आले. कोलकाताच्या विजयाची चर्चा सुरु असताना एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नाण्याच्या दोन्ही बाजूला बाजूला 'हेड' (H) चिन्ह होते, असं दिसून येत आहे.
कोलकाता आणि हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील नाणेफेकीचा स्लो-मोशनमधील व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये नाण्याच्या दोन्ही बाजूंना 'H' असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. वास्तविक हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने चेपॉक स्टेडियमवर अपेक्षेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आकडेवारीनुसार, धावांचा पाठलाग करणारा संघ या मैदानावर बहुतांश प्रसंगी वर्चस्व गाजवतो. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कोलकाताचा विजय होणार हे असा दावा सोशल मीडियावर केला जात होता.
आयपीएलमध्ये नाणेफेकीवरुन वाद-
आयपीएल 2024 मध्ये नाणेफेकीच्या फिक्सिंगवरून बराच वाद झाला होता. आयपीएल 2024 मध्ये नाणेफेक फिक्स करण्याचा वाद हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच समोर आला होता. अशा परिस्थितीत आयपीएल ब्रॉडकास्टरने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. नाणेफेक निश्चित झाल्याच्या वृत्तादरम्यान, नाणेफेकीच्या वेळी कॅमेरा मॅन नाण्याजवळ जाईल आणि ते हेड (H) किंवा टेल्स (T) आहे हे दाखवण्यासाठी कॅमेरा झूम इन करेल. मात्र आता नाण्याच्या दोन्ही बाजू एकच असल्याच्या व्हिडीओ व्हायरल होत असल्याचा दावा केला जात आहे. पंरतु व्हिडीओ एडिट केल्याचंही नेटकऱ्यांकडून बोलले जात आहे.
View this post on Instagram
नाणेफेक गमावणाऱ्या संघाच्या पदरी निराशाच -
आतापर्यंत 16 आयपीएल फायनल झाल्या आहेत.आतापर्यंतच्या सर्व फायनलवर नजर टाकल्यास नाणेफेक गमावणाऱ्या संघाला फटका बसलाय. 12 वेळा नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने आयपीएल चषकावर नाव कोरले आहे. तर नाणेफेक गमावणाऱ्या संघाला फक्त चार वेळा चषकावर नाव कोरता आले. 2024 च्या हंगामात देखील नाणेफेक गमावणाऱ्या संघाच्या पदरी निराशा पडली. कोलकाताना नाणेफेक जिंकत 2024चं जेतेपद पटकावलं.