Pune leopard: शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
Pune leopard: सुदैवाने घर मालकाने वेळीच आरडाओरडा केला, त्यामुळं बिबट्याने पळ काढला. खरपुडी रेटवडी निमगाव परिसरात बिबट्याचे वास्तव्य नागरिकांसाठी धोक्याचं होत असताना वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यात अपयशी ठरत आहे.

खेड: खेड तालुक्यातील खरपुडी येथे एक बिबट्या (Leopard) शिकार शोधत-शोधत थेट शेतकऱ्याच्या घरात शिरण्याच्या तयारीत होता, तितक्यात घर मालकाने आरडाओरडा केला आणि बिबट्याने (Leopard) तिथून पळ काढला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. मागच्या पंधरा दिवसात याच परिसरातील रेटवडी आणि निमगाव परिसरात चिमुकल्या मुलांवर बिबट्याने (Leopard) हल्ला केला, या बिबट्याची (Leopard) मजल आता वाढतच चालली असून बिबट्या (Leopard) आता थेट घरात शिरण्याच्या तयारीत आहेत. हे वास्तव सीसीटीव्हीने समोर आणलं आहे. सुदैवाने घर मालकाने वेळीच आरडाओरडा केला, त्यामुळं बिबट्याने पळ काढला. खरपुडी रेटवडी निमगाव परिसरात बिबट्याचे वास्तव्य नागरिकांसाठी धोक्याचं होत असताना वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यात अपयशी ठरत आहे.(Leopard)
Leopard Attack : साडेचार वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला; आईच्या आवाजामुळे बिबट्या भेदरला
निमगाव खंडोबा (ता. खेड) याठिकाणी एका साडेचार वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने काही दिवसांपूर्वी हल्ला करून त्याला जखमी केले आहे. या चिमुकल्याचे नाव देवांश योगेश गव्हाणे असे आहे.
निमगाव येथील भगतवस्ती परिसरीत दि. २५ रोजी रात्री ८ वाजता घराबाहेर खेळत असताना देवांश गव्हाणे यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि मानेला धरून शंभर फुट फरफटत नेलं. मात्र, त्याची आई बाहेर आली आणि जोरजोराने ओरडायला लागली. तिच्या आवाजामुळे बिबट्या भेदरला आणि तो पळून गेला. मानेला बिबट्याचे दात लागून जखम झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून निमगाव, दावडी, रेटवडी या परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून अनेकांच्या घरातून कोंबड्या, कुत्रे, बकऱ्या उचलून नेल्या आहेत. या परिसरात दिवसाढवळ्याही बिबट्याचे दर्शन होत असल्याचे शेतकरी चिंतेत आहेत.
पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, जेजुरी, पुरंदर भागात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर आहे. याठिकाणी सध्या ऊसतोड सुरु असल्याने शेतात लपून बसलेले बिबटे बाहेर पडू लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. परंतु दरवर्षी पेक्षा यंदा बिबट्याच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ही वाढ कशामुळे झाली? याबाबत कोणाकडेही उत्तर नाही. प्रशासनाकडून आता बिबट्यांना रोखण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत. प्रशासनाकडून या तालुक्यांना पिंजरे पुरवले जात आहेत. वनविभागाचे अधिकारीही या भागात तैनात आहे. परंतु बिबट्यांची संख्या कमी होताना दिसत नाही.























