(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
DC vs MI, IPL 2024 : दिल्लीने दिलेल्या 258 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने नऊ विकेटच्या मोबदल्यात 247 धावांपर्यंत मजल मारली.
DC vs MI, IPL 2024 : अटीतटीच्या सामन्यात दिल्लीनं मुंबईचा 10 धावांनी पराभव करत दोन गुणांची कमाई केली. दिल्लीने दिलेल्या 258 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने नऊ विकेटच्या मोबदल्यात 247 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकडून तिलक वर्मानं एकाकी झुंज दिली. तिलक वर्मानं शानदार अर्धशतक ठोकलं. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन सारखे दिग्गज फेल ठरले. दिल्लीकडून रसिख सलाम यानं भेदक मारा करत मुंबईच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं.
मुंबईची खराब सुरुवात -
दिल्लीने दिलेल्या 258 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली. मुंबईला 6 षटकात फक्त 65 धावा करता आल्या, पण तीन फलंदाजाना गमावलं होतं. माजी कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात तंबूत परतला. रोहित शर्माला फक्त 8 धावा काढता आल्या. ईशान किशन यानं 14 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी केली. यामध्ये चार चौकारांचा समावेश होता. तर सूर्यकुमार याद यानं 13 चेंडूमध्ये 26 धावा जोडल्या. यामध्ये दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. दोन्ही संघामध्ये पॉवरप्लेचा फरक स्पष्ट दिसला. दिल्लीनं पहिल्या सहा षटकामध्ये 92 धावा केल्या होत्या, तर मुंबईला 65 धावाच करता आल्या. मधल्या फळीतील नेहाल वढेरा यालाही मोठी खेळी करता आली नाही. वढेरानं दोन चेंडूत फक्त चार धावा केल्या. मोहम्मद नबीने 4 चेंडूमध्ये सात धावांची खेळी केली. यामध्ये एका षटकाराचा समावेश आहे.
हार्दिक पांड्याचा झंझावत, टीम डेविडचीही झुंज -
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यानं झंझावती फलंदाजी करत मुंबईची धावसंख्या वाढवली. हार्दिक पांड्याने फक्त 24 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. हार्दिक पांड्यानं मुंबईच्या धावगतील वेग दिला. हार्दिकने दिल्लीच्या गोलंदाजांचा खरपूस समचार घेतला. पण जम बसलेल्या हार्दिक पांड्याने विकेट फेकली. टीम डेविड यानेही 37 धावांची खेळी करत झुंज दिली. पण अखेरपर्यंत तो थांबू शकला नाही. टीम डेविड यानं 17 चेंडूमध्ये तीन षटकार आणि दोन चौकाराच्या मदतीने 37 धावा जोडल्या. टीम डेविड यानं 200 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली.
तिलक वर्माची एकाकी झुंज -
रोहित शर्मा, सूर्यासारखे दिग्गज फलंदाज तंबूत परतल्यानंतर तिलक वर्माने एकाकी झुंज दिली. तिलक वर्माने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पण तिलक वर्मा मुंबईला विजय मिळवून देता आला नाही. तिलक वर्मानं 32 चेंडूमध्ये 63 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्यानं चार चौकार आणि चार षटकार ठोकले. तिलक वर्मानं महत्वाच्या दोन भिगिदारी करत मुंबईची धावसंख्या वाढवली. तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी 39 चेंडूमध्ये 71 धावांची भागिदारी केली. तर टीम डेविड आणि तिलक व्मा यांनी 29 चेंडूत 70 धावा जोडल्या.
रसिख सलामचा भेदक मारा -
दिल्लीकडून रसिख सलाम यानं भेदक मारा केला. रसिख सलाम यानं 4 षटकांमध्ये 34 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत धाडलं. हार्दिक पांड्या, नबी आणि नेहाल वढेरा यांना सलामने तंबूत पाठवलं. खलील अहमद यानं 4 षटकात 45 धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाजांना तंबूत धाडलं. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या विकेटची पाटी कोरी राहिली. लिझाद विल्यमसलाही विकेट घेता आली नाही.