(Source: ECI/ABP News/ABP Majha)
DC vs RCB 1st Innings Highlights: विराट कोहलीचे अर्धशतक, फिरकीच्या जाळ्यात आरसीबी, दिल्लीला विजयासाठी 175 धावांची गरज
IPL 2023, RCB vs DC : विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने निर्धारित 20 षटकात 174 धावांपर्यंत मजल मारली.
IPL 2023, RCB vs DC : विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने निर्धारित 20 षटकात 174 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीची फलंदाजी फिरकीसमोर ढेपाळली. दिल्लीच्या फिरकी गोलंदाजांनी 11 षटकात फक्त 77 धावां खर्च केला अन् चार विकेट घेतल्या. दिल्लीला विजयासाठी 175 धावांचे आव्हान आहे.
विराट कोहलीचे अर्धशतक
एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपली. विराट कोहलीने 34 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने एक षटकार आणि सहा चौकार लगावले. विराट कोहलीचे आयपीएलच्या सोळाव्या हंगमातील तिसरे अर्धशतक होय.. चार डावात विराट कोहलीने तीन अर्धशतके झळकावली आहेत. विराट कोहली याने यंदाच्या हंगमात चार डावात 200 धावांचा पल्ला पार केलाय. त्याशिवाय चिन्नास्वामी स्टेडिअमवर विराट कोहलीने २५०० धावांचा पल्ला पार केला आहे. एकाच मैदानावर इतक्या धावा करणारा विराट कोहली एकमेव फलंदाज आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक रुप धारण केले होते. फाफ डु प्लेसिससोबत विराट कोहलीने ४.४ षटकात ४२ धावांची भागिदारी केली. त्यानंतर लोमरोर याच्यासोबतही ४७ धावांची भागिदारी केली.
मॅक्सवेल-फाफ-लोमरोरची छोटेखानी खेळी -
कर्णधार फाफ डु प्लेसिस याला चांगला सूर गवसला होता. फाफ याने सुरुवातीपासूनच आक्रमक रुप धारण केले होते. फाफ याने विराट कोहलीसोबत ४२ धावांची भागिदारी केली. फाफ याने १६ चेंडूत २२ धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. अमन खान याने फाफ याचा अप्रतिम झेल घेतला. फाफ बाद झाल्यानंतर महिपाल लोमरोर याने विराट कोहलीची साथ दिली. लोमरोर याने २६ धावांची छोटेखानी खेळी केली. यामध्ये त्याने दोन षटकार लगावले. मॅक्सवेलही धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात बाद झाला.. त्याला 24 धावांचे योगदान देता आले. १४ चेंडूत तीन षटकारासह २४ धावांचे योगदान दिले. कुलदीप यादव याने मॅक्सवेलचा अडथळा दूर केला.
चांगल्या सुरुवातीनंतर आरसीबीची फलंदाजी ढासळली -
विराट कोहली याने दमदार अर्धशतक करत आरसीबीला चांगली सुरुवात करुन दिली. पण त्यानंतर आरसीबीची फलंदाजी ढासळली. एकापाठोपाठ एक विकेट गमावल्या. 132 धावसंख्येवर आरसीबीने लागोपाठ तीन विकेट गमावल्या. हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक एकापाठोपाठ एक बाद झाले. ग्लेन मॅक्सवेल आणि महिपाल लोमरोर यांना चांगली सुरुवात मिळाली पण मोठी खेळी करण्यात अपयश आले. तर हर्षल पटेल आणि दिनेश कार्तिक अपयशी ठरले. हर्षल पटेल सहा धावा काढून तंबूत परतला तर कार्तिकला एकही धाव काढता आली नाही.
रावत-शाहबाजची फिनिशिंग -
लागोपाठ विकेट पडल्यानंतर अनुज रावत आणि शाहबाज यांनी दमदार खेळी केली. दोघांनीही अखेरच्या ३४ चेंडूत विकेट न जाऊ देता ४२ धावांची भागिदारी केली. यामध्ये शाहबाद अहमद याने १२ चेंडूत २० धावांची खेळी केली. तर अनुज रावत याने २२ चेंडूत १५ धावांचे योगदान दिले.
कुलदीप यादव -मिचेल मार्श यांचा भेदक मारा -
कुलदीप यादव आणि मिचेल मार्श यांनी भेदक मारा करत आरसीबीच्या फलंदाजीला खिंडार पाडले. मिचेल मार्श याने दोन षटकात दोन विकेट घेतल्या. तर कुलदीप यादव याने चार षटकात २३ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. कुलदीप यादव याने एकाच षटकात मॅक्सवेल आणि कार्तिक याला बाद करत आरसीबीच्या मोठ्या धावसंख्येच्या स्वप्नावर पाणी फेरले. ललीत यादव याने चार षटकात २९ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. तर अक्षर पटेल याने तीन षटकात २५ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली.