IPL 2023 Points Table : दिल्ली कॅपिटल्सकडून हैदराबादचा पराभव, गुणतालिकेत काय बदल? पाहा तुमचा आवडता संघ कोणत्या क्रमांकावर?
SRH vs DC : सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीने सात धावांनी विजय मिळवला. दिल्लीचा या मोसमातील हा दुसरा विजय आहे.
IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) सनरायजर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) पराभव स्वीकारावा लागला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 144 धावांचं लक्ष्य दिलं. लक्ष्याचा पाठलाग हैदराबादचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 137 धावा करू शकला. यासह दिल्ली कॅपिटल्सनं यंदाच्या मोसमातील दुसरा विजय मिळवला आहे. दरम्यान, या विजयानंतर गुणतालिकेतील संघांच्या स्थानामध्ये कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली कॅपिटल्स पॉईंट्स टेबलमध्ये अद्यापही सर्वात शेवटी आहे.
दिल्लीने सामना जिंकल्यानंतर गुणतालिकेत काय बदल?
आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग दुसरा विजय आहे. संघाने आतापर्यंत सात सामने खेळले असून त्यापैकी पाच सामने गमावले आणि दोन सामने जिंकले आहेत. हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यापूर्वी दिल्ली 2 गुण आणि -1.183 नेट रनरेटसह गुणतालिकेत दहाव्या स्थानावर होती. हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील विजयानंतर संघाच्या स्थानात बदल झाला नसला, तरी गुण आणि नेट रनरेट वाढला आहे. सध्या दिल्ली संघ गुणतालिकेत 4 गुण आणि -0.961 निव्वळ धावगतीसह शेवटच्या स्थानावर आहे.
पराभवानंतर हैदराबादच्या स्थिती कायम
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघ 6 पैकी 2 विजय आणि 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर होता. त्याचबरोबर दिल्लीविरुद्धचा सामना हरल्यानंतरही संघाच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. पराभवानंतर, संघ 4 गुण आणि -0.725 निव्वळ रनरेटसह 9व्या क्रमांकावर आहे.
गुणतालिकेतील टॉप-5 संघ कोणते?
सध्या, चेन्नई सुपर किंग्स संघ 7 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. चेन्नई संघाकडे 10 गुण आणि +0.662 नेट रनरेट आहे. यानंतर राजस्थान रॉयल्स 7 पैकी 4 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानकडे 8 गुण आणि +0.844 नेट रनरेट आहे. लखनौ, गुजरात आणि बंगळुरु अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. लखनौ सुपर जायंट्स संघाकडे 8 गुण आणि +0.547 नेट रनरेट आहे. गुजरात टायटन्स संघाकडे 8 गुण आणि +0.212 नेट रनरेट आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे 8 गुण आणि -0.008 नेट रनरेट आहे.
इतर संघांची सध्याची परिस्थिती
गुणतालिकेत पंजाब किंग्स सहाव्या स्थानावर आहे. पंजाबने 7 पैकी 4 सामने जिंकले असून संघाकडे 8 गुण आणि -0.162 नेट रनरेट आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघ सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई संघाने 6 पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मुंबई संघाकडे 6 गुण आणि -0.254 नेट रनरेट आहे. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स आठव्या क्रमांरावर आहे. कोलकाता संघाने 7 पैकी 2 सामने जिंकले असून संघाकडे 4 गुण आणि -0.186 नेट रनरेट आहे. याशिवाय सनरायझर्स हैदराबाद नवव्या आणि दिल्ली कॅपिटल्स दहाव्या स्थानावर आहेत.