Delhi Capitals चा खेळाडू अडकला लग्नबंधनात, पत्नीसोबतचा फोटो केला शेअर
IPL 2023 : आयपीएल सुरु असतानाच दिल्लीचा खेळाडू लग्नाच्या बेडीत अडकला आहे.
IPL 2023, Mitchell Marsh Marriage : दिल्ली कॅपिटल्सचा विस्पोटक फलंदाज मिचेल मार्श लग्नबंधनात अडकला आहे. मिचेल मार्श याने प्रेयसी ग्रेटा मार्क हिच्यासोबत सात फेरे घेतले आहेत. मिचेल मार्श याने इन्स्टाग्रामवर लग्न झाल्याची माहिती दिली आहे. मिचेल मार्श याने लग्नासाठी आयपीएलमधून ब्रेक घेतला होता. आज त्याने लग्न केलेय. दिल्लीचा अष्टपैलू मिचेल मार्श आणि प्रेयसी ग्रेटा मार्क यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडाही झाला होता.
मिचेल मार्श याने लग्न केल्याची माहिती इन्स्टाग्रामवरुन आपल्या चाहत्यांना सांगितली. त्याने पत्नीसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. याला मिचेल मार्श याने सुंदर असे कॅप्शन दिलेय. तो कॅप्शनमध्ये म्हणतोय की, 'माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे. ' मिचेल मार्श याला क्रीडा विश्वातून शुभेच्छा दिल्या जात आहे. आरसीबीचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेल आणि अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
दोन वर्षापूर्वी साखरपुडा -
गेल्या काही वर्षांपासून मिचेल मार्श आणि ग्रेटा मार्क रिलेशनशिपमध्ये होते. 11 स्पटेंबर 2021 रोजी या दोघांनी साखरपुडा केला होता. त्यावेळी मिचेल मार्श याने इन्स्टाग्रामवर फोटोही पोस्ट केले होते. मिचेल मार्श याने ग्रेटा मार्क हिला ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध द फार्म मार्ग्रेट नदीजवळ प्रपोज केले होते. ग्रेटा मार्क द फार्म मार्ग्रेट रीव्हरजवळच आपला व्यावसाय करते. मागील काही वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी स्पॉट करण्यात आले होते. त्याशिवाय ग्रेटा मार्क अनेकदा आयपीएलच्या सामन्याला उपस्थित होती.
दिल्लीची अवस्था खराब -
डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघाची आयपीएलमधील अवस्था खराब आहे. दिल्लीला पहिल्या तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मंगळवारी दिल्ली आणि मुंबई यांच्यामध्ये लढत होणार आहे. मिचेल मार्श याने लग्नासाठी आयपीएलमधून ब्रेक घेतला आहे. तो आठवडाभरासाठी उपलब्ध नसेल. गुजरात आणि लखनौ यांच्याविरोधात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. लखनौने दिल्लीचा 50 धावांनी पराभव केला होता. तर गुजरातविरोधात झालेल्या रोमांचक सामन्यात सहा विकेटने पराभव झाला होता. गुणतालिकेतही दिल्लीचा संघ तळाशी आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दिल्लीच्या संघाला पुढील काही सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे.