IPL 2023, CSK vs KKR 1st Innings Highlights : शिवम दुबेची एकाकी झुंज, कोलकात्यासमोर 145 धावांचे माफक आव्हान
CSK vs KKR, IPL 2023 : शिवम दुबे आणि रविंद्र जाडेजा यांच्या अर्धशतकी भागिदारीच्या जोरावर चेन्नईने 144 धावांपर्यंत मजल मारली.
CSK vs KKR, IPL 2023 : शिवम दुबे आणि रविंद्र जाडेजा यांच्या अर्धशतकी भागिदारीच्या जोरावर चेन्नईने 144 धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासून चेन्नईच्या फलंदाजांवर अंकूश ठेवला. शिवम दुबे याने नाबाद 48 धावांची योगदान दिले. तर कॉनवे याने ३० धावांची छोटेखानी खेळी केली. कोलकात्याला विजयासाठी 145 धावांचे माफक आव्हान आहे.
कर्णधार एमएस धोनीने चेपॉक मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांनी संयमी सुरुवात केली. पण चेन्नईची फलंदाजी फिरकीपुढे ढेपाळली. २१ धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर लागोपाठ विकेट पडत गेल्या. ठरावीक अंतराने कोलकात्याने चेन्नईच्या फलंदाजांना बाद केले. सुरुवातीपासून एकही मोठी भागिदारी करु दिली नाही. ऋतुराज गायकवाड १७ धावांवर बाद झाला. ऋतुराजने १३ चेंडूत दोन चौकारासह १७ धावांची खेळी केली. ऋतुराज बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे याने कॉनवेच्या साथीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण अजिंक्य रहाणे यालाही वरुण चक्रवर्ती याने तंबूत पाठवले. अजिंक्य रहाणे याने ११ चेंडूत एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने १६ धावांची खेळी केली.
अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर कॉनवेही लगेच तंबूत परतला. कॉनवे याने २८ चेंडूत तीन चौकारासह ३० धावांची खेळी केली. कॉनवे बाद झाल्यानंतर चेन्नईने लागोपाठ विकेट फेकल्या. अंबाती रायडू चार धावांवर बाद झाला. मोईन अली एक धावांवर बाद झाला. लागोपाठ विकेट पडल्यामुळे चेन्नईचा डाव ढेपाळला होता. ११ षटकात ७२ धावांच्या मोबदल्यात अर्धा संघ तंबूत परतला होता. अडचीत सापडेल्या चेन्नईसाठी शिवम दुबे आणि रविंद्र जाडेजा धावून आले.
शिवम दबे आणि रविंद्र जाडेजा यांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. दोघांनी चेन्नईचा डाव सावरला. सुरुवातीला संयमी फलंदाजी करत विकेट पडू दिली नाही.. त्यानंतर दोघांनी आक्रमक फलंदाजी करत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. रविंद्र जाडेजा आणि शिवम दुबे यांनी ६८ धावांची भागिदारी केली. चेन्नईकडून ही सर्वात मोठी भागिदारी झाली. रविंद्र जाडेजा याने २४ चेंडूत २० धावांची भागिदारी केली. या खेळीत जाडेजाने एक षटकार लगावला. शिवम दुबे ४८ धावांवर नाबाद राहिला. दुबेने ३४ चेंडूत ४८ धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. एमएस धोनी दोन धावांवर नाबाद राहिला.
सुनील नारायणचा भेदक मारा -
सुनील नारायण याने आज भेदक मारा केला. नारायण याने चार षटकात अवघ्या १५ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्तीनेही दोन विकेट घेतल्या. पण चार षटकात त्याने ३६ धावा खर्च केल्या. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण चेन्नईच्या डावाला सुरुंग लागला. वरुण चक्रवर्तीने फॉर्मात असलेल्या ऋतुराज गायकवाड आणि अजिंक्य रहाणे यांना तंबूत पाठले. तर नारायण याने मोईन अली आणि अंबाती रायडूला बाद केले. वैभव अरोरा आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. हर्षित राणा आणि सुयेश शर्मा यांची विकेटची पाटी कोरीच राहिली.