IPL 2022 : हार्दिक पांड्या राजस्थानची डोकेदुखी वाढवणार, पाहा आकडे काय सांगतात
IPL 2022 : आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टाइटन्स (GT) यांच्यादरम्यान लढत होणार आहे. या सामन्यावेळी सर्वांच्या नजरा गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याकडे असतील.
IPL 2022 : आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टाइटन्स (GT) यांच्यादरम्यान लढत होणार आहे. या सामन्यावेळी सर्वांच्या नजरा गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याकडे असतील. तुम्हाला विचार पडला असेल, असं का? तर कारणही तसेच आहे. हार्दिक पांड्याची बॅट राजस्थानविरोधात नेहमीच चालली आहे. हार्दिक पांड्याने राजस्थानविरोधात धावांचा पाऊस पाडला आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना हार्दिक पांड्याने राजस्थानच्या गोलंदाजांची धू धू धुलाई केली आहे. आता हार्दिक पांड्या गुजरातचा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. हार्दिक पांड्याचा राजस्थान विरोधात चांगला रेकॉर्ड आहे. आज होणाऱ्या सामन्यातही हार्दिक पांड्या हीच लय कामय राखू शकतो.
राजस्थानविरोधात हार्दिकची कामगिरी -
राजस्थानविरोधात हार्दिक पांड्या आठ वेळा मैदानात उतरला आहे. हार्दिक पांड्याने राजस्थानच्या गोलंदाजांनी मनसोक्त धुलाई केली. हार्दिकने 186 च्या स्ट्राइक रेटने धावा कुटल्या आहेत. त्याने तब्बल 62 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडला आहे. त्याशिवाय चार विकेटही घेतल्या आहेत. यंदाच्या हंगामात राजस्थान आणि गुजरात पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत. त्यात हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून मैदानात उतरत आहे.
हार्दिकला विक्रम करण्याची संधी -
हार्दिक पांड्याला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. टी 20 क्रिकेटमध्ये 100 झेल घेण्याच्या विक्रमापासून हार्दिक पांड्या दोन पावले दूर आहे. राजस्थानविरोधातील सामन्यात हार्दिक पांड्याने दोन झेल घेतल्यास टी 20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 100 झेलची नोंद होणार आहे. आतापर्यंत हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने चार सामन्यात तीन विजय मिळवले आहेत.
राजस्थान-गुजरातची ताकद अन् कमजोरी काय?
राजस्थानच्या संघाकडून फलंदाजीची धुरा जोस बटलरवर याच्यावर असणार आहे. तर शिम्रॉन हेटमायर हा देखील चांगली खेळी करताना दिसत आहे. देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार संजू सॅमसन हे दोघे सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहेत. राजस्थानकडे वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा योग्य समतोल साधण्यात आला आहे. फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलवर राजस्थानच्या फिरकीची मदार असणार आहे. तर रविचंद्रन अश्विनची त्याला पुरेशी साथ मिळत आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट प्रतिस्पर्धी संघांसाठी घातक ठरत आहेत. तर गुजरातच्या फलंदाजीची भिस्त शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक पंड्यावर आहे. मॅथ्यू वेड धावांसाठी झगडत आहे. तर डेव्हिड मिलरचा खेळही अपेक्षेनुसार उंचावलेला नाही. अभिनव मनोहर आणि बी. साई सुदर्शन यांनी जबाबदारीने खेळ करण्याची गरज आहे. राहुल तेवतिया देखील चांगली खेळी करत आहे. सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक गणला जाणारा लॉकी फग्र्युसन, मोहम्मद शमी असा वेगवान गोलंदाज गुजरातकडे आहेत. फिरकी गोलंदाज रशीद खान हा त्यांचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.