IPL 2022 Delhi vs Mumbai : आज दिल्ली विरुद्ध मुंबई भिडणार, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत आमने सामने
आज चाहत्यांना क्रिकेटचा चांगलाचं थरार अनुभवायला मिळणार आहे. कारण आज महत्त्वाच्या दोन संघात सामने होणार आहेत.
IPL 2022 Delhi vs Mumbai : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सीझनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज चाहत्यांना क्रिकेटचा चांगलाचं थरार अनुभवायला मिळणार आहे. कारण आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (DC vs MI) यांच्यात होणार आहे. तर दुसरा पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (PBKS vs RCB) यांच्यात होणार आहे. दरम्यान, या चारही संघांमध्ये एकापेक्षा एक तुफानी फलंदाज असल्यानं आजचा उत्साहही दुप्पट आहे. हा सामना दुपारी साडेतीन वाजता होणार आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. रोहित शर्मा बरोबरचं इशान किशन आणि किरॉन पोलार्ड यांच्यासारखे तगडे खेळाडू देखी मुंबईकडे आहेत. त्यांच्या कामगिरीवर देखील सर्वाचं लक्ष असणार आहे. तर दिल्लीचा संघ देखील तगडा मानला जातोय. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ आज मैदानात उतरणार आहे. त्याच्या कामगिरीकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दिल्ली संघाकडून टीम सेफर्ट आणि पृथ्वी शॉ डावाची सुरुवात करु शकतात. कारण ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर अद्याप संघाशी जोडलेला नाही. दिल्लीच्या कामगिरीची चावी मात्र कर्णधार पंतच्या हातात असणार आहे. त्याला आघाडीतून नेतृत्व करावे लागेल. वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज रोव्हमन पॉवेल, फॉर्मात असलेला सरफराज खान आणि अंडर 19 विश्वचषक विजेता कर्णधार यश धुल यांच्याकडून मधल्या फळीत चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल फिनिशरची भूमिका बजावतील. गोलंदाज कुलदीप यादव अक्षरसोबत फिरकीची धुरा सांभाळू शकतो. वेगवान आक्रमणाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा अॅनरिक नॉर्टजे करेल, त्याला मुस्तफिझूर रहमानची साथ असेल. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग हा युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटीलाही आजमावू शकतात, त्याने स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. दिल्लीने गेल्या वेळी दोन्ही सामन्यात मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळं संघ यावेळीही त्याच मनोधैर्याने जाणार आहे.
दरम्यान, ब्रेबॉर्नची खेळपट्टी आत्तापर्यंत फलंदाजांसाठी उपयुक्त ठरली आहे. गेल्या 10 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 183.3 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. दिवसाचा सामना असल्यानं दव देखील भूमिका बजावणार नाही. हवामान दमट असणार. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याची शक्यता दाट आहे.