(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022 : सामना तर गेलाच... लखनौच्या कर्णधाराला आर्थिक भुर्दंड, एका खेळाडूलाही फटकारले
RCB vs LSG, IPL 2022 : जोश हेजलवूडचा भेदक मारा, कर्णधार डु प्लेसिसच्या तुफानी खेळीच्या बळावर आरसीबीने लखनौचा (Lucknow Super Giants) 18 धावांनी पराभव केला.
RCB vs LSG, IPL 2022 : जोश हेजलवूडचा भेदक मारा, कर्णधार डु प्लेसिसच्या तुफानी खेळीच्या बळावर आरसीबीने लखनौचा (Lucknow Super Giants) 18 धावांनी पराभव केला. पराभवासोबतच लखनौच्या कर्णधाराला आणखी एक धक्का बसलाय. आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी केएल राहुलला आर्थिक दंड ठोठावण्यात आले आहे. त्याशिवाय पंचाशी हुज्जत घातल्यामुळे स्टॉयनिसलाही फटकारलेय.
आरसबीकडून पराभव पत्कारावा लागल्यानंतर लखनौचा कर्णधार केएल राहुलला आर्थिक दंडाचा फटका बसला आहे. आयपीएलच्या आचरसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी राहुलला दंड ठोठावण्यात आला आहे. सामन्याची 20 टक्के रक्कम कापण्यात आली आहे. आयपीएल आचारसंहिता लेवल 1 चं उल्लंघन केल्याप्रकरणी राहुलला दंड ठोठावण्यात आला आहे. राहुलने आपला गुन्हा मान्य केला आहे.
स्टॉयनिसला फटकारले -
लखनौचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसची जीभ घसरली. पंचाच्या एका निर्णायवर स्टॉयनिस रागाला गेला. रागाच्या भरात स्टॉयनिसने पंचाला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लखनौच्या 19 व्या षटकात मार्कस स्टॉयनिसची जीभ घसरली. 19 वे षटक टाकण्यासाठी आरसीबीकडून जोश हेजलवूड आला होता. फलंदाजीसाठी मार्कस स्टॉयनिस होता. सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये होता. हेजलवूडचा पहिला चेंडू पाचव्या यष्टीबाहेर होता. स्टॉयनिसने वाईड असल्याची दाद मागितली. मात्र पंचाने हा चेंडू योग्य असल्याचं सांगितलं. यावर स्टॉयनिसने हसून दाद दिली. मात्र, हेजलवूडच्या दुसऱ्या चेंडूवर स्टॉयनिसने स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. पण या चेंडूने थेट यष्ट्या उद्धवस्त केल्या. बाद झाल्यानंतर स्टॉयनिसला राग अनावर आला. यावेळी त्याने रागात पंचाला शिवीगाळ केली. स्टम्प माईकमध्ये आवाज कैद झाला. स्टॉयनिसचा रागात शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोमांचक सामन्यात स्टॉयनिसने 15 चेंडूत 24 धावा केल्या. मोक्याच्या क्षणी बाद झाल्यामुळे स्टॉयनिसला राग अनावर आला अन् पंचाला शिवीगाळ केली. या सामन्यावर आरसीबीने कब्जा केला.