IPL 2022: धोनीच्या 'या' जाहिरातीवर आक्षेप, आयपीएल प्रोमोविरोधात तक्रार
IPL 2022 स्पर्धेसाठी महेंद्र सिंह धोनीचा एक प्रोमो प्रसारित झाला होता तो आता वादात अडकला आहे. या प्रोमोविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या यंदाचा मोसम महेंद्र सिंह धोनीसाठी फार काही चांगला ठरलेला नाही. त्याच्या चेन्नई सुपर किंग्ज या संघाने पहिले तीन सामने सलग गमावले आहेत. तसंच, या स्पर्धेसाठी धोनीचा एक प्रोमो प्रसारित झाला होता तो आता वादात अडकला आहे. या प्रोमोविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कन्झ्युमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटीने (CUTS) ही तक्रार दाखल केली आहे. ही एक रस्ता सुरक्षा संस्था आहे. ही जाहिरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे CUTS ने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
कंपनी प्रोमो मागे घेणार
तक्रारीनंतर भारतीय जाहिरात मानक परिषदेने (ASCI) IPL गव्हर्निंग कौन्सिलला हा प्रोमो काढून टाकण्यास सांगितलं आहे. ASCI कडे तक्रार आल्यानंतर ग्राहक तक्रार समितीच्या (CCC) सदस्यांनी हा प्रोमो पाहिला. यानंतर एएससीआयला प्रोमोमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळलं.
यानंतर त्यांनी जाहिरात बनवणाऱ्या कंपनीला संबंधित प्रोमो 20 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बदलण्याचे किंवा काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीनेही ते मान्य केले असून प्रोमो मागे घेणार आहे.
When it's the #TATAIPL, fans can go to any extent to catch the action - kyunki #YehAbNormalHai!
— IndianPremierLeague (@IPL) March 4, 2022
What are you expecting from the new season?@StarSportsIndia | @disneyplus pic.twitter.com/WPMZrbQ9sd
धोनी सुपर ओव्हरसाठी बस रस्त्याच्या मधोमध थांबवतो
या प्रोमोमध्ये धोनी रजनीकांत स्टाईलमध्ये ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसत आहे. तो बस चालवताना दिसतो तेव्हाच अचानक रस्त्याच्या मधोमध ब्रेक लावतो, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. मग बस मागे घेतो. बस थांबवून प्रवाशाला खिडकीतून एका बाजूला बघायला सांगितो. सगळ्यांना ते दिसत आहे की नाही? असंही तो विचारतो.
इतक्यात एक वाहतूक पोलीस येऊन काय चाललंय अशी विचारणा करतो. यावर धोनी म्हणतो की, सुपर ओव्हर चालू आहे. हे ऐकून वाहतूक पोलीस तिथून निघून जातात. हे वाहतूक नियमांचे उल्लंघन असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.