T Natarajan Ruled Out of IPL 2021: हैदराबादला मोठा धक्का, जलद गोलंदाज टी नटराजन स्पर्धेतून बाहेर
हैदराबादचा मुख्य वेगवान गोलंदाज टी नटराजन आयपीएल 2021 मधून बाहेर पडला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे नटराजनने स्पर्धेतून माघार घेतली आहे.
T Natarajan Ruled Out of IPL 2021: आयपीएल 2021 मध्ये सलग तीन सामने गमावल्यानंतर चौथ्या सामन्यात हैदराबादला पहिला विजय मिळाला आहे. मात्र यानंतर हैदराबादला एक मोठा धक्का बसला आहे. हैदराबादचा मुख्य वेगवान गोलंदाज टी नटराजन आयपीएल 2021 मधून बाहेर पडला आहे. नटराजनच्या स्पर्धेतून बाहेर झाल्याने हैदराबादची गोलंदाजी काही प्रमाणात कमकुवत होणार आहे. डेथ ओव्हरमध्ये शानदार यॉर्कर टाकणारा नटराजन यंदाच्या सीजनमध्ये या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही.
गुडघ्याच्या दुखापतीमुळे नटराजनची माघार
मिळालेल्या माहितीनुसार, नटराजन गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएल 2021 मधून बाहेर पडला आहे. याआधीही त्याला गुडघेदुखीचा त्रास झाला होता. त्यानंतर तो बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीत दोन महिने राहिला होता. नटराजनच्या गुडघ्याची समस्या पुन्हा एकदा गंभीर झाल्याचे सांगण्यात येत आहे आणि म्हणूनच त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे.
मागील सामन्यातही नटराजन खेळू शकला नाही
हैदराबादच्या शेवटच्या सामन्यात नटराजन संघाचा भाग नव्हता. मात्र सामन्यानंतर फ्रँचायझीचे टॉम मूडी यांनी सांगितले की नटराजनला विश्रांती देण्यात आली आहे. नटराजनला संघातून वगळण्यात आले नाही, तर त्याला विश्रांती देण्यात आली आहे. आम्हाला माहित आहे की आयपीएल स्पर्धा खूप दिवस चालणार आहे. नटराजनने अलीकडेच बरंच क्रिकेट खेळलं आहे, असं टॉम मूडी यांनी सांगितलं.
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सांगितले होते की, नटराजनच्या गुडघ्याला दुखापत आहे. जर तो उपचारासाठी बायो बबलमधून बाहेर पडला तर पुन्हा संघात सामील होण्यापूर्वी त्याला सात दिवस क्वॉरंटाईन व्हावं लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुडघ्याच्या दुखापतीमुळे नटराजनला बायो बबलमधून बाहेर पडावं लागणार आहे. त्यानंतर संघात परतण्यासाठी त्याला क्वॉरंटाईन व्हावं लागणार आहे. या कारणास्तव त्याने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.