(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2020 DC vs KXIP : सुपर ओव्हरमधील पराभवानंतर कर्णधार केएल राहुलने मान्य केली चूक, म्हणाला...
सुपर ओव्हरमधील पराभवानंतर कर्णधार केएल राहुल म्हणतो, 'माझ्यासाठी हा सामना एक चांगला-वाईट अनुभव होता. सामन्याचा निकाल काहीही असो, कर्णधार म्हणून तो मी स्वीकारतो. सामन्यात आम्ही बर्याच चुका केल्या.'
IPL 2020 DC vs KXIP : आयपीएलच्या 13 व्या सीजनच्या दुसऱ्याच सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. सुपरओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर सहज मात केली. विजयासाठी पंजाबने दिल्लीला अवघ्या 3 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पंजाबकडून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मयंक अगरवालला सुपरओव्हरमध्ये न उतरवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही संघांनी 157-157 धावा केल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. मार्क्स स्टॉयनिसने आणि कागिसो रबाडा दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
थरारक सामन्यातील पराभवानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल खूप निराश झाला आहे. “माझ्यासाठी हा सामना एक चांगला-वाईट अनुभव होता. जर तुम्ही आमच्या डावाच्या 10व्या ओव्हरमध्ये सामना सुपर ओव्हरवर जाईल असे म्हटले असते तर मी मान्य केले असते. असो, ठिक आहे. आमचा पहिला सामना होता, या सामन्यातून आम्ही बर्याच गोष्टी शिकलो” असं मत राहुलने व्यक्त केलं.
तसेच राहुलने असेही म्हटले की, मयंक अगरवालने जवळपास आम्हाला जिंकवून दिले होते. त्याच्या फलंदाजीमुळे इतर खेळाडूंना बराचं आत्मविश्वास आला आहे. सामन्याचा निकाल काहीही असो, कर्णधार म्हणून तो मी स्वीकारतो. सामन्यात आम्ही बर्याच चुका केल्या. फक्त 55 धावांवर पाच विकेट गमावूनही सामन्यात परतलो असेही राहुल म्हणाला.
IPL 2020 DC vs KXIP | मयंक अगरवालची धडाकेबाज खेळी अपयशी, पंजाबचा दिल्लीकडून सुपर ओव्हरमध्ये पराभव
टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी का घेतली?
टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीच्या निर्णयावर राहुल म्हणाला की, खेळपट्टीबद्दल आम्हाला फारसे माहिती नव्हते. दोन्ही संघांसाठी विकेट (पीच) एकसारखीच होती. अशा परिस्थितीत आम्ही यासाठी काही खास करू शकलो नाही.
रवी बिश्नोईचं पदार्पण
अंडर 19 स्टार रवी बिश्नोईने पंजाबकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्याचा आज प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. फिरकीपटू बिश्नोईने यावर्षी जानेवारीत पार पडलेल्या अंडर 19 विश्वचषकात भारताकडून खेळला होता. विश्वचषकात बिश्नोईने चमकदार कामगिरी केली होती. महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने बिश्नोईला 2 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. फिल्पर्स, लेग-स्पिन आणि उत्कृष्ट गुगली ही बिश्नोईची जमेची बाजू आहे.
IPL 2020 | किंग्ज इलेव्हन पंजाब सर्वाधिक कर्णधार बदलणारा संघ, केएल राहुल बारावा कर्णधार