GT vs KKR 1st Innings Highlights: विजय शंकरचे तांडव, गुजरातची 204 धावांपर्यंत मजल
IPL 2023, Match 13, GT vs KKR Match : साई सुदर्शन आणि विजय शंकर यांच्या अर्धशतकाच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 204 धावांपर्यंत मजल मारली.
IPL 2023, Match 13, GT vs KKR : साई सुदर्शन आणि विजय शंकर यांच्या अर्धशतकाच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 204 धावांपर्यंत मजल मारली. विजय शंकर याने कोलकात्याला विजयासाठी 205 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. विजय शंकर याने अखेरच्या षटकात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. विजय शंकर याने 24 चेंडूत 63 धावांची वादळी खेळी केली.
साई सुदर्शन पुन्हा चमकला -
पहिल्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणाऱ्या साई सुदर्शन याने मागील दोन्ही सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. साई सुदर्शन याने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकाला गवसणी घातली. केन विल्यमसनच्या दुखापतीमुळे साई सुदर्शन याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले होते, त्याने या संधीचे सोने केले. गुजरातचा संघ अडचणीत सापडला तेव्हा साई सुदर्शन याने विस्फोटक अर्धशतक झळकावले. साई सुदर्शन याने 38 चेंडूत 53 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले. आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील हे त्याचे दुसरे अर्धशतक होय.
विजय शंकरचा फिनिशिंग टच -
आघाडीचे फंलदाज बाद झाल्यानंतर विजय शंकर याने मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडत तांडव घातला. विजय शंकर याने अखेरच्या दोन षटकात धावांचा पाऊस पाडला. त्याने अवघ्या 24 चेंडूत 63 धावांची खेळी करत फिनिशिंग टच दिला. विजय शंकरच्या विस्फोटक खेळीच्या बळावर गुजरातने दोनशे धावांचा पल्ला पार केला. विजय शंकर याने 24 चेंडूत पाच षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी केली.
शुभमनची संयमी फलंदाजी -
कोलकाताविरोधात शुभमन गिल याने संयमी फलंदाजी केली. गिल याने 31 चेंडूत 39 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार लगावले. शुभमन गिल याने वृद्धीमान साहा याच्यासोबत 33 धावांची सलामी दिली. त्यानंतर साई सुदर्शन याच्यासोबत दुसऱ्याविकोटसाठी 67 धावांची भागिदारी करत गुजरातच्या डावाला आकार दिला.
इतर फलंदाजांची कामगिरी कशी?
वृ्द्धीमान साहा याने 17 चेंडूत 17 धावांची खेळी केली. यामध्ये तीन चौकार लगावले. तर अभिनव मनोहर याने आठ चेंडूत 14 धावा जोडल्या. यामध्ये त्याने तीन चौकार लगावले. मिलर तीन धावांवर नाबाद राहिला.
शुभमनचा दोन हजार धावांचा पल्ला -
गुजरताचा युवा फलंदाज शुभमन गिल याने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कोलकात्याविरोधात गिल याने आयपीएलमध्ये दोन हजार धावांचा पल्ला पार केला. गिल याने हा पराक्रम 74 व्या डावात केला. शुभमन गिल याने आयपीएलमध्ये दोन हजार धावांचा पल्ला पार करत मोठा विक्रम नावावर केलाय. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान दोन हजार धावांचा पल्ला पार करणाऱ्या फलंदाजात केएल राहुल पहिल्या क्रमांकावर आहे. राहुलयाने अवघ्या 60 डावात दोन हजार धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकर याने 63 डावात दोन हजार धावा केल्या आहेत. तर ऋषभ पंत याने 64 आणि गौतम गंभीर याने 69 डावात दोन हजार धावांचा पल्ला पार गाठलाय. सुरेश रैना याला दोन हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी 69 डावांची वाट पाहावी लागली होती. विरेंद्र सेहवाग याने 70 डावात हा कारनामा केलाय.
हार्दिक पांड्या प्लेईंग 11 च्या बाहेर -
नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरातकडून आज राशिद खान नाणेफेकीसाठी आला होता. राशिद खान याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याची तब्येत व्यवस्थित नाही, त्यामुळे तो आजचा सामना खेळत नाही, असे राशिद खान याने नाणेफेकीवेळी सांगितले. नाणेफेक झाल्यानंतर राशिद म्हणाले की, आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहे. खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक वाटत आहे. चांगली धावसंख्या उभारु... हार्दिक पांड्या आज खेळत नाही, त्याची तब्येत ठीक नाही. आम्ही हार्दिकसोबत कोणताही रिस्क घेणार नाही. पुढील सामन्यापर्यंत हार्दिक पांड्या तंदुरुस्त होईल. आम्ही संघ म्हणून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हार्दिक पांड्याच्या जागी प्लेईंग 11 मध्ये विजय शंकर याला स्थान देण्यात आले आहे. दरम्यान कोलकात्याकडूनही संघात दोन बदल करण्यात आले आहेत. कोलकात्याने लॉकी फर्गुसनला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. त्याशिवाय एन जगदीशन यालाही खेळवलेय.