IPL 2022 : आरसीबीचा माजी खेळाडू म्हणतोय, विराट कोहलीला आरामाची गरज
Virat Kohli, IPL 2022 : रनमशिन विराट कोहलीची बॅट गेल्या काही दिवसांपासून शांतच आहे. आयपीएलमध्येही विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
Virat Kohli, IPL 2022 : रनमशिन विराट कोहलीची बॅट गेल्या काही दिवसांपासून शांतच आहे. आयपीएलमध्येही विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीला अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. यंदाच्या हंगामात विराट कोहली दोन वेळा शून्य धावसंख्येवर बाद झालाय. लागोपाठ सामन्यात अपयशी ठरणाऱ्या विराट कोहलीला राजस्थानविरोधात सलामीला पाठवण्यात आले. मात्र, विराट पुन्हा अपयशी ठरला. सलामीला आलेला विराट फक्त 9 धावा काढून माघारी परतला. खराब कामगिरीमुळे विराट कोहलीवर टीकास्त्र सोडलं जात आहे. अनेक क्रीडा तज्ज्ञांनी विराट कोहलीचा बॅडपॅच सुरु असल्याचे सांगितले. विराट लवकरच पुनरागमन करेल, असेही काहींनी सांगितले. आरसीबीचा माजी खेळाडू आरपी सिंह याने विराट कोहलीच्या फॉर्मवर प्रतिक्रिया दिली आहे.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंह याने विराट कोहलीला आरामाची गरज असल्याचे सांगितले. आरपी सिंह आरसीबीकडून खेळलाय. आरपी सिंह म्हणाला की, 'विराट कोहलीने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये विराट कोहलीचं नाव आहे. पण गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीची बॅट शांत आहे.' आरसीबीने विराट कोहलीला आराम द्यायला हवा, असेही आरपी सिंह म्हणाला.
आरसीबी संघ व्यवस्थापन आणि विराट कोहली फॉर्ममधून परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण त्यांना यामध्ये यश मिळत नाही. अशात विराट कोहलीला आराम करण्याची गरज आहे. आणखी एक दोन सामन्यात विराट कोहली फ्लॉप झाल्यास आरसीबीने आराम द्यावा, असे आरपी सिंह म्हणाला.
मंगळवारी राज्यस्थान रॉयल्सविरोधात सलामीला आलेला विराट कोहली पुन्हा एकदा फ्लॉप झाला. 10 चेंडूत 9 धावा काढून विराट माघारी परतला. विराट कोहली यावेळी रंगात दिसला नाही. प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर विराट तंबूत परतला. राजस्थानने या सामन्यात आरसीबीचा 29 धावांनी पराभव केला.
2019 पासून विराटची बॅट शांत -
विराट कोहलीला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी एक म्हणून ओळखलं जातं. विराट कोहलीची धावांचू भूक पाहून त्याला रनमशीनही म्हटले जाते. धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीसारखा भरवशाचा फलंदाज दुसरा कुणीच नाही. पण मागील काही हंगामापासून विराट कोहलीची बॅट शांत आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून अखेरचं शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी आले होते. बांगलादेशविरोधात झालेल्या डे नाईट कसोटी सामन्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर शतक झळकावले होते. त्यानंतर विराट कोहलीला शतक झळकावता आलेलं नाही. आयपीएलमध्ये 2016 चा अपवाद वगळता त्यानंतर प्रत्येक हंगामात विराट कोहलीची बॅट शांतच राहिली आहे.