IPL 2024: 'विराट कोहलीवर टीका केल्यामुळे जिवे मारण्याची धमकी मिळाली'
Simon Doull On Virat Kohli : आयपीएल 2024 चा महासंग्राम संपला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादचा पराभव करत चषकावर नाव कोरले.
Simon Doull On Virat Kohli : आयपीएल 2024 चा महासंग्राम संपला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादचा पराभव करत चषकावर नाव कोरले. आरसीबीचं आव्हान प्लेऑफमध्ये संपुष्टात आले. पण स्पर्धेदरम्यान विराट कोहलीवर टीका केल्यामुळे न्यूझीलंडच्या दिग्गज समालोचक सायमन डूल याला जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. दिनेश कार्तिकसोबत बातचीत करताना सायमन डूल यानं याबाबतचा खुलासा केला. आयपीएल स्पर्धेदरम्यान विराट कोहलीच्या प्रदर्शनावर टीका केल्यामुळे मला जिवे मारण्याची धमकी मिळाली होती, असे सायमन डूल यानं दिनेश कार्तिकला सांगितले. पण याप्रकरणाला मी वैयक्तीक कधीच घेतले नाही. विराट कोहली आणि माझे संबंध खूप चांगले आहेत. मी विराट कोहलीबद्दल मी अनेक चांगल्या गोष्टी बोललो आहे, लोक त्याला नजरअंदाज करतात, असेही सायमन डूल म्हणाला.
'विराट कोहलीच्या खेळावर प्रश्नचिन्ह'
सायमन डूल म्हणला की, स्टार फलंदाज विराट कोहलीच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, विशेषकरुन T20 फॉरमॅटमध्ये त्याच्या खेळावर प्रश्न उपस्थित केला होताा. त्यामुळे मला टीकेचा सामना करावा लागला. त्याशिवाय जिवे मारण्याची धमकीही मिळाली. आयपीएल 2024 च्या पहिल्या हाफमध्ये विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता. विराट कोहलीला टी20 क्रिकेटमध्ये खेळण्याची पद्धत बदलावी लागेल. त्याला स्ट्राईक रेट सुधारावा लागेल, अशी टीका अनेकांनी केली होती. त्यामध्ये सायमन डूल यांचाही समावेश होता. आरसीबी आणि लखनौ यांच्यातील सामन्यावेळी विराट कोहलीने 42 धावांवरुन 50 धावांपर्यंत पोहचण्यासाठी 10 चेंडू घेतले होते. त्यावरुन सायमन डूल यांनी विराटवर टीकासत्र सोडले होते.
Simon Doull: "I have said a thousand great things about Virat Kohli but I say one thing negative or construed to be negative, and I get death threats. That's the shame of it" pic.twitter.com/eRV6EKqoRj
— CricWick (@CricWick) May 29, 2024
विराट कोहलीबद्दल मी अनेकदा चांगल्या गोष्टी बोललोय, पण...
क्रिकबजवर सायमन डूल आणि भारताची माजी क्रिकेटर दिनेस कार्तिक यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी सायमन डूल म्हणाला की, विराट कोहली खूपच चांगला खेळाडू आहे. तो बाद होतो की नाही, याची चिंता करायला नाही पाहिजे. विराट कोहलीबद्दल मी अनेक चांगल्या गोष्टी बोललो आहे. पण मी एकवेळा विराट कोहलीबद्दल नकारात्मक बोललो, म्हणून जिवे मारण्याची धमकी मिळाली.
सायमन डूल याला धमकी देणाऱ्या चाहत्यांना दिनेश कार्तिकने झापलं, हे चुकीचं असल्याचं त्यानं सांगितलं.